राज्यातील दोन कुलगुरुंनी कार्यकाल पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण!
राज्यातील दोन विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने अनेक चर्चा याबाबत केल्या जात आहेत.शासकीय हस्तक्षेपामुळे कुलगुरूंनी राजीनामे दिला असल्याचा थेट आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे.
मुंबई : राज्यातील दोन विद्यापीठाच्या कुलगुरूंनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने अनेक चर्चा याबाबत केल्या जात आहेत. त्यात विद्यापीठच्या कारभारात होणारा शासकीय हस्तक्षेप व दबाव यामुळे कुलगुरूंनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिल्याचा आरोप अभाविप संघटनेने उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाविकास आघाडीवर केला आहे.
जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू (बाटू) डॉ. व्ही. आर. शास्त्री यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपविला. त्यानंतर डॉ पी. पी. पाटील यांच्या जागेवर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कार्यभार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ई. वायूनंदन यांना देण्यात आला आहे तर डॉ. शास्त्री यांच्या जागेवर आयसीटी, मुंबईचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांना बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
लोणेरे येथील ‘बाटू’चा पदभार डॉ. शास्त्री यांनी मार्च 2019 मध्ये स्विकारला होता. अध्यापन, प्रशासन आणि संशोधन क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन डॉ. शास्त्री यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली होती. मात्र, दोनच वर्षात त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे कुलगुरू डॉ.पाटील यांचा कार्यकाल 25 ऑक्टोबर 2021 मध्ये पूर्ण होत असताना 8 महिण्याआधीच प्रकृती स्वास्थ ठीक नसल्याचे कारण देत राजीनामा दिला आहे.
कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी अशा प्रकारे दोन्ही कुलगुरूंनी राजीनामा देण्याने शिक्षण वर्तुळात तर्क वितर्क लावले जात असताना कुलगुरूंचे हे राजीनामे शासकीय हस्तक्षेपाला कंटाळून दिला असल्याचं अभाविप व सिनेट सदस्यांचे म्हणणे आहे. मागील काही दिवसांपासून सरकार विद्यापीठाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत असून परीक्षा पासून ते विविध कार्यक्रम, जनता दरबार, कामाचे कंत्राट देणे या सगळ्या गोष्टीत राज्य सरकारचा वाढता हस्तक्षेप याला कंटाळून कुलगुरू राजीनामा देणे हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचा अभाविपचे म्हणणे आहे. शिवाय, याचा निषेध म्हणून सर्वांनी एकजूट होऊन आवाज उठविणे गरजेचा असल्याच आवाहन अभाविप कडून करण्यात आले आहे.