वेळअमावस्या! वनभोजनाचा आनंद लुटण्यासाठी आज लातूरकर शेतात, गावं पडली ओस
सर्व लातूरकर आज शेतात गेल्याने गावे ओस पडलेली पाहायला मिळत आहे. निमित्त आहे वेळअमावस्येचं.
लातूर : भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषीशी निगडित अनेक सणवार असतात असाच एक सण वेळअमावस्या. शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील थोर आज शेतात वनभोजनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. लातूर शहरात सध्या अघोषित संचारबंदी लागल्या सारखी स्थिती आहे.
बैलपोळा आणि वेळअमावस्या हे सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे समजले जातात. बैल पोळ्याच्यादिवशी ज्याच्या जिवावर शेती चालते त्या बैलांना खाऊपिऊ घालुन पुजा केली जाते तर वेळअमावस्यादिवशी ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो त्या काळ्या आईची पुजा केली जाते. लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत ही वेळअमावस्या दिवशीची पुजा महत्त्वाची मानली जाते. या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पुजा मांडली जाते. शेतात खरीप व रब्बी या दोन हंगामात मिळून वेळअमावस्या दिवशी लक्ष्मीची पुजा केली जाते. मातीची लक्ष्मीची मूर्ती तयार केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात, यथासांग पुजा केली जाते, शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. रब्बी हंगामातील गहु, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदि पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे अशी प्रार्थना केली जाते.
वनभोजनाचा आनंद.. पेरणीनंतरची सातवी अमावस्या म्हणजे वेळअमावस्या. जुनमध्ये पेरणी होते व सातवी अमावस्या डिसेबंर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवाड्यात येते. खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते, तुरही ऐन बहरात असते. रब्बी हंगामातील पेरणी होऊन सपुंर्ण शेत हिरवेगार झालेले असते. ऊन्हाची तीव्रता नसते, ऊसाची गाळप सुरू होत असल्यामुळे ऊस खाण्याची हौस भागवता येते. गुळरस हाही आनंद उपभोगता येतो. घरोघरी गौरीपुजनाचे महत्त्व जितके असते तितकेच महत्त्व शेतात या दिवशीच्या लक्ष्मीपुजनाला असते. रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या रानात उंडे व अंबीलचा काला तसेच पाण्याचा चर शिंपडला जातो. तोंडातून हर हर महादेव, हरभला असे म्हणत तो सर्व शेती फिरतो. ज्वारी व बाजरीचे उंडे, सर्व भाज्यांपासून तयार केली जाणारी भाजी व अंबिल या पदार्थांना वेळ अमावस्येच्या दिवशी जेवणात पहिल्या दर्जाचा मान असतो. या व्यतिरिक्त जो तो आपल्या कुवतीप्रमाणे अन्य पदार्थ तयार करतो. नुकताच आलेला वाटाणा, तुरीचे दाणे घालून केलेली भाजी, (भज्जी), तीळ गुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लावून केलेली आंबील, अशा पदार्थाचा आस्वाद घेण्यात येतो. आंबील, गव्हाची खीर, भज्जी, भाकरी, कुटलेली शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेसा. नंतर बोर,पेरू हरबरे, असे असंख्य पदार्थ असतात. जेवण्याच्या आधी ह्या रानमेवानेच पोट भरून जाते. यासाठी घरातील महिला दोन दिवसांपासून तयारी करतात.
आयुर्वेदशास्त्रनुसार हिवाळा महत्वाचा.. हिवाळा हा मनाला उत्साह आणि नवचेतना देणारा ऋतु आहे. आयुर्वेदशास्त्रनुसार या ऋतुनुसार घेतला जाणारा आहार शरीराला मानवणारा असतो. शिवाय तब्येत कमविण्यासाठी हिवाळा अत्यंत योग्य काळ आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा ऋतू लाभदायी ठरावा. यासाठी या काळात येणारा भाजीपाला फळे भरपूर खाऊन निरोगी राहण्याचा सल्ला आहार तज्ञ देतात. हिवाळ्यामध्ये विविध भाज्या तसेच फळांचा आहार घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचन शक्तही चांगली कार्यान्वीत होते. हिवाळ्यात बाजारपेठेमध्ये आलेल्या फळभाज्या खाणे योग्य असते. या काळात त्वचा कोरडी व रूक्ष पडते. कारण शरीराला स्निग्ध पदार्थाची आवश्यकता असते, त्यामुळे या ऋतूत दुध, तुप, दही, लोणी ताक यासारख्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करावे. हिवाळ्यामध्ये शरीराला आतून उब मिळावी व थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी बाजरीची भाकरी तसेच गरम पदार्थांची घरोघरी मेजवानी असते. यामुळे दूरदुरून अनेकजण यावेळच्या लातुरात येतात.
वेळअमावस्या साजरी करण्याची प्रथा कधी सुरू झाली असावी याची निश्चित नोंद उपलब्ध नाही. वेळ अमावस्येच्या काळात लातूरसारख्या शहरी भागात तर कफ्र्यु सारखे वातावरण रस्त्यावर दिसते. आपल्यापेक्षा कोणीतरी अज्ञात शक्ती मोठी आहे. त्यासमोर वर्षातुन एकदा तरी नतमस्तक व्हावे याची शिकवणुक देणारी संस्कृती जोपासायची परंपरा या निमित्ताने पहायला मिळते.