Vande Bharat Express: मुंबई-गोवा प्रवास आता हायस्पीड; कोकण मार्गावर 5 जूनपासून धावणार 'वंदे भारत' ट्रेन
Vande Bharat: मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. 5 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत वंदे भारत ट्रेन धावेल.
Vande Bharat: कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) अखेर मुहूर्त मिळाला आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला येत्या शनिवारी, म्हणजेच 3 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर, 5 जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. या गाडीला रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात रत्नागिरी आणि खेड येथे थांबे देण्यात आले आहेत.
मुंबईकरांना चौथी वंदे भारत ट्रेन आता मिळणार आहे. येत्या 3 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एकवरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी साडेदहा वाजता ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
वंदे भारत ट्रेनची वेळ आणि थांबे
मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस कोकणवासियांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्याला सहा दिवस चालवण्याचं सध्या प्लॅनिंग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मडगाव, थिविम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी या स्थानकांवर वंदे भारत ट्रेन थांबेल. सध्या दिलेल्या प्रस्तावानुसार, सीएसएमटी वरून सकाळी 5.35 ला ट्रेन सुटेल, तर मडगाव येथे दुपारी 1.15 वाजता वंदे भारत ट्रेन पोहोचेल. त्यानंतर लगेच मडगाव वरुन तीच वंदे भारत दुपारी 2.35 वाजता मुंबईकडे रवाना होईल आणि रात्री 10.25 वाजता ट्रेन मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
वंदे भारत एक्सप्रेस केवळ 7 तास 50 मिनिटांत मुंबई ते मडगाव हे अंतर कापणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही कोकण मार्गावर धावणारी सर्वात जलद एक्सप्रेस असणार आहे. तेजस एक्सप्रेसपेक्षा देखील एक तास लवकर ही ट्रेन मडगावला पोहोचेल, त्यामुळे या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
मुंबईतून धावणाऱ्या वंदे भारतची स्थिती काय?
आतापर्यंत मुंबईतून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं मध्य रेल्वेच्या आकडेवारीतून सांगण्यात येत असलं तरी खरं चित्र मात्र तसं दिसत नाही. शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला नाशिकपर्यंतच सर्वाधिक प्रतिसाद मिळतो, तर सोलापूरला जाणाऱ्या गाडीसाठी पुण्यापर्यंतच सर्वाधिक प्रतिसाद असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. तर, दुसरीकडे या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटांचे दर जास्त असल्यामुळे देखील हा प्रवाशांसाठी गंभीर विषय आहे.
मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या साधारण तिकीटाचे दर 975 रुपये (Chair Class) आणि एक्झिक्युटीव्ह क्लासचे (Executive Class) तिकीट 1,840 रुपये आहे. मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या साधारण तिकीटाचे (CC) दर 1,300 रुपये आणि एक्झिक्युटीव्ह क्लासचे (EC) तिकीट 2,365 रुपये आहे.
तेजस एक्सप्रेसवर होणार परिणाम?
मुंबई ते मडगाव धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसचे दर साधारण एसी कोचसाठी 1,525 आणि एक्झिक्युटीव्ह क्लाससाठी 2,980 रुपये इतके आहेत. त्यामुळे नवीन सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे दर इतकेच किंवा याहीपेक्षा कमी असावेत, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.
दुसरीकडे आता, वंदे भारत एक्सप्रेस धावली तर तेजस एक्सप्रेसचं काय होणार? त्यावर काही परिणाम होणार का? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जर वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस एकामागे एक सुटल्या, तर दोघांपैकी तेजस एक्सप्रेसच्या प्रवासी प्रतिसादावर नकारात्मक परिणाम होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळेच, सकाळी वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीवरून आणि तेजस एक्सप्रेस मडगाव वरून चालवण्याच्या विचारात रेल्वे प्रशासन आहे.
हेही वाचा: