छ. संभाजीनगर नंतर आता अहिल्यानगर... अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर असं करण्यात आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अहमदनगर: संभाजीनगर नंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं झालं असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर झाल्याची घोषणा केली. आमच्या कार्यकाळात आणि चौंडीमधील जयंतीच्या कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा केली हे आमचं भाग्य असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी दिसली नसती, आहिल्यादेवी यांनी कधीही भेदभाव केला नाही असं सांगत अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आहिल्यादेवी होळकर यांचे नाव हिमालयाएवढे आहे. अहिल्यादेवी यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी खूप काही केलं. अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. आमच्या सरकारच्या काळात अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय होणार असल्याने हे आमचं भाग्य आहे. आजच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आम्हाला भाग्य मिळाले. ज्यांनी इथे येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना 20 दिवसात सत्तेतून घालवून टाकण्याचे काम आम्ही केलं."
अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 रोजी मलिक अहमद बादशहाने केली. नुकतीच अहमदनगर शहराच्या स्थापनेला 532 वर्ष पूर्ण झाली आहे. मलिक अहमद निजामशहाच्या नावावरुनच अहमदनगर हे नाव पडले आहे. अहमदनगरचे नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून करण्याची मागणी केली जात होती.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आधी ही मागणी केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात एक पत्रही लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, "राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे अवघ्या हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा मुघल, निजामशाहीत हिंदूसंस्कृतीवर हल्ले होत होते, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. अनेक घाट, बारव बांधले. मंदिरांचे पुनर्निर्माण केलं, स्त्रीयांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला."