Maharashtra Politics : राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी! प्रकाश आंबेडकर घालणार शेतकरी नेते रविकांत तुपकरांना साद
Prakash Ambedkar : राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी होण्याची शक्यता आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे शेतकरी नेते रविकांत तुपकरांना साद घालणार असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Politics अकोला : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता नव्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साऱ्यांना वेध लागले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीपासून ते देश पातळीवर राजकीय घडामोडींना आता वेग आले आहे. सध्या जरी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी त्या कधीही आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता मोर्चे बांधणीसाठी सज्ज झाला आहे. अशातच आता राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी होण्याची शक्यता आहे.
कारण वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे शेतकरी नेते रविकांत तुपकरांना (Ravikant Tupkar) साद घालणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर रविकांत तुपकरांना सोबत घेण्याची चाचपणी करत आहेत. रविकांत तुपकरांनी बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. परिणामी, दोन्ही नेत्यांमध्ये सध्या जरी प्रत्यक्ष चर्चा झाली नसली तरी प्राथमिक बोलणीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात नेमकं काय होतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रकाश आंबेडकरांची तिसऱ्या आघाडीत जाण्याची शक्यता धूसर
गेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून तब्बल अडीच लाख मते घेतली होती. तर एकट्या सिंदखेडराजा मतदारसंघात रविकांत तुपकरांना 30 हजार मतांची आघाडी होती. सोबतच बुलढाणा, मेहकर आणि चिखली मतदारसंघात तुपकरांना लक्षणीय मते होती. राजू शेट्टींनी तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढल्यानंतर राज्यातील 27 जिल्ह्यात रविकांत तुपकरांचे कार्यकर्ते आणि संघटन सक्रिय झाल्या आहेत. तर दुसरीकडे तुपकरांशिवाय राज्यातील तिसरी आघाडी अपूर्ण असल्याचं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे आंबेडकर तिसऱ्या आघाडीत जाण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जात आहे.
संभाव्य राजकीय मैत्रीसंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा
प्रकाश आंबेडकर आणि रविकांत तुपकर एकत्र आल्यास याचा फायदा पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. संभाव्य राजकीय मैत्रीसंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. मात्र अद्याप रविकांत तुपकर आणि प्रकाश आंबेडकरांची प्रत्यक्ष भेट आणि चर्चा होणे बाकी. परिणामी दोन्ही नेत्यांच्या प्रस्तावित युतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.
हे ही वाचा