(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लसवंत कोरोनापासून सेफ, लसवंचितांना धोका कायम, राज्यात गेल्या चार महिन्यांत 94 टक्के मृत्यू लस न घेतलेल्यांचे
लस घेतल्यानंतरही मृत्यू झालेल्या 126 रुग्णांचे विश्लेषण विभागाने केले. यातील 88 टक्के रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतली होती, तर सुमारे १२ टक्के रुग्णांनी दुसरी मात्रा पूर्ण केलेली होती.
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पुन्हा वर्तवण्यात येत आहे. मात्र पुन्हा कोरोनाची लाट आली तर लसीकरण झालेल्या नागरिकांना धोका कमी असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यात 11 मे ते 22 ऑगस्ट 2021 या काळात मृत्यू झालेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा आढावा घेण्यात आला. या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या 18 हजार 592 रुग्णांपैकी 5725 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये 5398 (94.29 टक्के) रुग्णांनी कोणतीही लस घेतलेली नव्हती, तर सुमारे सहा टक्के रुग्णांनी लस घेतली होती.
रुग्णालयात दाखल झालेल्यापैकी 16 हजार 180 रुग्णांनी (87 टक्के) लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. लस न घेतलेल्या रुग्णांपैकी सुमारे 33 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर लस घेतलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे 13 टक्के आढळले. यामुळे मृत्यू आणि रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी वेगाने लसीकरण किती गरजेचे आहे, हे अधोरेखित झाले आहे.
Corona Vaccination : देशात लसीकरणाचा 'महाविक्रम'; एकाच दिवसात एक कोटीहून अधिक नागरिकांना डोस
लस घेतल्यानंतरही मृत्यू झालेल्या 126 रुग्णांचे विश्लेषण विभागाने केले. यातील 88 टक्के रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतली होती, तर सुमारे १२ टक्के रुग्णांनी दुसरी मात्रा पूर्ण केलेली होती. लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे. लस घेतल्यानंतरही मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 68 टक्के रुग्ण हे 60 वर्षावरील होते, तर 63 टक्के रुग्णांना दीर्घकालीन आजार होते.
लशीसह उपायांचे पालन केल्यास ही साथ आटोक्यात आणण्यात यश येईल. मात्र, लस घेतल्यानंतरही सतर्कता हवी. लस घेतल्यानंतर बाधित आणि मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.