शहरी नक्षलवाद प्रकरण; भावाच्या मृत्यूचं करण देत प्रा. आनंद तेलतुंबडेंचा नव्यानं जामीन अर्ज
आपल्याला जामीन मिळावा असा अर्ज प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी केला आहे. त्यावर एनआयए कोर्टाने तपासयंत्रणेला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी अंतरिम जामीन मिळण्यासाठी नव्यानं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जात त्यांनी नुकत्याच झालेल्या नक्षलवादी चकमकीत मारला गेलेला आपला भाऊ आणि जहाल नक्षली मिलिंद तेलतुंबडेच्या मृत्यूचं कारण दिलं आहे. विशेष एनआयए न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांनी या अर्जावर एनआयएला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
गडचिरोलीतील कोर्चीमध्ये स्पेशल फोर्ससोबत झालेल्या चकमकीत 26 नक्षली ठार झाले होते. यामध्ये मिलिंद तेलतुंबडेचाही समावेश आहे. साल 2018 च्या एल्गार परिषद प्रकरणात मिलिंद तेलतुंबडे फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आला होता. आणि याच एल्गार परिषद प्रकरणात आनंद तेलतुंबडेदेखील आरोपी आहेत. तेलतुंबडे यांच्यावर एनआयएने गंभीर आरोप केले असून आरोपपत्रही दाखल केलेलं आहे.
नव्वदच्या दशकात मिलिंदचा आणि आमच्या कुटुंबाचा संबंध तुटला आणि तो कोणाच्याच संपर्कात नव्हता. आपल्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झाल असून आईच वयही आता नव्वदच्या आसपास आहे. त्यामुळे घरातील मोठा मुलगा या नात्यानं अशा प्रसंगी आपण कुटुंबासोबत असणं भावनिक दृष्ट्या आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला किमान पंधरा दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी आनंद तेलतुंबडे यांनी या जामीन अर्जात केली आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयानं आनंद तेलतुंबडे यांना फोनवरून आईशी बोलण्याची परवानगी दिली होती.
भीमा कोरेगाव येथील झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रा. आनंद तेलतुंबडेंना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तेलतुंबडे हे नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. जुलै 2021 मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
संबंधित बातम्या :
- Gadchiroli : मिलिंद तेलतुंबडेचा उल्लेख "जनयोद्धा', हत्येचा बदला घेणार; नक्षलवाद्यांकडून सहा राज्यांत बंदचे आवाहन
- शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडेंच्या जामीन अर्जावर उत्तर द्या, मुंबई उच्च न्यायालयाचे एनआयएला निर्देश
- शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना आणखीन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha