'हेमंत करकरे यांनी खोटी साक्ष देण्यासाठी दबाव टाकला होता', मालेगाव ब्लास्ट खटल्यात माजी सैनिक असलेल्या साक्षीदाराचा थेट आरोप
Hemant Karkare : हेमंत करकरे यांनी मालेगाव ब्लास्ट प्रकरणात खोटी साक्ष देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला होता, असा खळबळजनक आरोप गुरूवारी या खटल्यातील साक्षीदार असलेल्या एका माजी सैनिकानं कोर्टात केला.
Hemant Karkare : हेमंत करकरे यांनी मालेगाव ब्लास्ट प्रकरणात खोटी साक्ष देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला होता, असा खळबळजनक आरोप गुरूवारी या खटल्यातील साक्षीदार असलेल्या एका माजी सैनिकानं कोर्टात केला. मात्र हा आरोप करताच हा साक्षीदार फितूर झाल्याचं एनआयएनं जाहीर केलं. त्यामुळे साल 2008 च्या मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात साक्षीदार फितूर होण्याचं सत्र सुरूच आहे. गुरूवारच्या सुनावणीत साक्षीदार क्रमांक 243 यांनी एटीएसवर खळबळजनक आरोप करताच हा साक्षीदार फितूर झाल्याचं सरकारी पक्षानं घोषित केलं. मालेगाव ब्लास्ट प्रकरणात हा फितूर घोषित करण्यात आलेला 19 वा साक्षीदार ठरला आहे.
माजी सैनिक असलेल्या या साक्षीदारानं तत्कालीन एटीएस प्रमुख शहिद हेमंत करकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. या तपासाचे प्रमुख असलेल्या हेमंत करकरे यांनी आपल्यावर अनेकांची नावं घेण्यासाठी दबाव टाकला होता. अन्यथा या प्रकरणात गोवण्याची धमकी दिली होती, असंही त्यानं कोर्टाला सांगितलं. मुळात आपण लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या व्यतिरीक्त कुणालाही ओळखत नाही. पुरोहित हे मध्य प्रदेशातील पंचमरही इथं आपले शेजारी होते म्हणून आपण त्यांना ओळखतो, या व्यतिरीक्त त्यांच्याशीही आपला परिचय नाही, असं त्यानं कोर्टात स्पष्ट केलं. हेमंत करकरे हे मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्यात शहीद झाले होते. विशेष एनआयए न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यापुढे सुरू असलेल्या सुनावणीत यापूर्वीही अनेक साक्षीदारांनी एटीएसवर दबाव टाकून साक्ष नोंदवल्याचा आरोप केलेला आहे.
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात 7 जणांना आपला प्राण गमवावा लागला. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करून त्यांच्यावर मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. यातील दोन संशयित आरोपी अद्याप फरार असून सर्व आरोपी जामीनवर बाहेर आहेत. माध्यमांनी या खटल्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे वादविवाद, मुलाखत, चर्चा करू नयेत, साक्षीदारांची नावे, पत्ता उघड करू नये, इत्यादी बंधनं कोर्टानं घातलेली आहेत.