(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये : शरद पवार
राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीए, अनेक विमा कंपन्या त्यांच्या कामात दिरंगाई करत आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, विमा कंपन्यांनी आता शेतकऱ्यांचा सहनशीलतेचा अंत पाहू नये.
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला गेला आहे. अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीए, अनेक विमा कंपन्या त्यांच्या कामात दिरंगाई करत आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, विमा कंपन्यांनी आता शेतकऱ्यांचा सहनशीलतेचा अंत पाहू नये. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारने विमा कंपन्यांची बैठक घ्यावी. बैठकीत केंद्राने विमा कंपन्यांना त्यांच्या कामाबाबत निर्देश द्यावे. शेतकऱ्यांना ताठकळत ठेवू नये. पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा विमा कंपन्यांना दिला आहे.
दरम्यान, इफको टोकियो या पीक विमा कंपनीचे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. याबाबत माध्यमांनी शरद पवारांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता पवार म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षांनी कायदा हातात घेऊ नये. एकत्र बसून तोडगा काढावा.
पीक विमा कंपनीचे पुण्यातील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले
दरम्यान, काल (06 नोव्हेंबर) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडमध्ये ओल्या दुष्काळाची पाहणी केली. यावेळी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना म्हणाले की, 'काळजी करु नका मला विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय ते माहीत आहे', असं वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता. त्यानंतर आज शिवसैनिकांनी थेट विमा कंपनीचे ऑफिस फोडले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक गावात शिवसेनेकडून शेतकरी मदत केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती दिली. या मदत केंद्रात शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कसे मिळवायचे याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.
उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना बळीराजा गहिवरला | नांदेड | ABP Majha