(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांकडूनही समाचार, कोण काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या संतापजनक वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांनीही समाचार घेतला आहे.
नांदेड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या संतापजनक वक्तव्याचा सर्वच थरातून निषेध व्यक्त केला जात आहे. नांदेड येथे काँग्रेसच्या आढावा बैठकीस उपस्थित असणारे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, काँगेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यानंतर नांदेड येथे काँग्रेसच्या आढावा बैठकीस उपस्थित असणारे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, काँगेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य व्यक्तिगत द्वेषातून आलेलं दिसतंय, केंद्रीय मंत्र्यांनी कितपत खालच्या पातळीला जाऊन वक्तव्य करावे याचं हे उदाहरण आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नेत्यांनी नेहमीच विरोधीपक्षातील नेत्यांचा सन्मान केला आहे. राणेंचं हे वक्तव्य निषेधार्थ असल्याची टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलीय.
तर अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्याविषयी अथवा एखाद्या संवैधानिक पदाविषयी वापरणे हे महाराष्ट्राची संस्कृती नसून बाळासाहेब जे बोलायचे ते महाराष्ट्राची संस्कृती जपून बोलायचे असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे अशा प्रकारे केंद्रीय मंत्र्यांनी वक्तव्य करणे हे महाराष्ट्राचे संस्कार नसल्याचे मत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नोंदवलय.
काय म्हणाले होते नारायण राणे?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.