केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरी भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
गृहमंत्री अमित शहा यांनी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना 2018-19 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झालेले प्रताप पाटील चिखलीकरांच्या घरी थेट भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस बल (CRPF) कॅम्प येथे वृक्ष लागवड व सैनिक संमेलनासाठी आले होते. मात्र या दौऱ्यानंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर जोरदार चर्चेत आले आहेत. कारण केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपल्या दौऱ्यातर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरी अनपेक्षित भेट दिली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना 2018-19 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झालेले प्रताप पाटील चिखलीकरांच्या घरी थेट भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गृहमंत्र्यांच्या चिखलीकर यांच्या अनपेक्षित गृहभेटीने राजकारण्यांच्या मात्र भुवया उंचावल्या आहेत. परंतु गृहमंत्र्याच्या या गृह भेटीने प्रताप पाटील चिखलीकरांचे संसदेतील राजकीय वजन वाढून केंद्रीय मंत्री पदाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.
राज्याच्या तुलनेत नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यातून कोणत्याही भाजपा नेत्यास केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले नाही. मात्र या गृहभेट व चहा पानाने चिखलीकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खासदारांच्या घरी जात केंद्रीय गृहमंत्री यांनी चिखलीकर परिवारातील चिमुकल्यांशी भेटत फोटो देखील काढले. या भेटीने नांदेडसह मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून देशातील 170 रेजिमेंटमध्ये एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार एक कोटीवा पिंपळ वृक्ष गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते CRPF कॅम्प मुदखेड येथे लावण्यात आला. त्यानंतर सैनिक संमेलनास गृहमंत्री अमित शहा यांनी संबोधित केले. या नियोजित कार्यक्रमानंतर अमित शाह यांनी जगप्रसिद्ध पवित्र शीख धर्मस्थळ गुरू गोविंद सिंगजी गुरुद्वारा पायरीचे दर्शन घेऊन भेट दिली.
कोण आहेत प्रताप पाटील चिखलीकर?
प्रताप पाटील चिखलीकर यांचा राजकीय प्रवास कंधार तालुक्यातील त्यांच्या चिखली या गावातून झाला. ते पहिल्यांदा चिखली या गावचे सरपंच झाले. त्यानंतर पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सभापती ते 2004 ला लोहा कंधार मतदार संघाचे अपक्ष आमदार म्हणून पाहिल्यादा निवडून आले. त्यानंतर ते काँग्रेस मध्ये गेले परंतु त्यांची जवळीकता ही विलासराव देशमुख यांच्याशी होती. त्यामुळे त्यांचे व अशोक चव्हाण यांचे मतभेद निर्माण होऊन ते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर अजित पवार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले परंतु त्याठिकाणी ते दोन वर्षापेक्षा जास्त स्थिरावले नाही. 2014 ला शिवसेनेत पक्षप्रवेश करून लोहा कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आशिष शेलार यांच्याशी असलेल्या संबंधामुळे 2018 ला ते भाजपमध्ये आले. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपाकडून निवडणूक लढवत खासदार म्हणून निवडूनही आले.