Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई : येत्या 21 फेब्रुवारीपासून न्यायालयात नियमीत सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये अशी मागणी आम्ही केली होती. तरी देखील निवडणूक आयोगाने हा निकाल दिलाय. न्यायालयाच्या निर्णयाआधी निर्णय देण्याची निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली? असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने आज निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्वव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
"न्यायालयाचा नर्णय येण्याआधी निर्णय देण्याची निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली? निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार असून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
न्यायव्यवस्था दबावाखाली कशी येईल, याची अनेक उदाहरणं पाहिली आहेत. आजचा हा निर्णय अत्यंत अनेपेक्षित आहे, कारण जवळपास सहा महिने सर्वोच्च न्यायालयत हे प्रकरण सुरु आहे. त्याची आता सलग सुनावणी सुरु होईल. तो निकाल लागेल तोपर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय देऊ नये अशी मागणी आम्ही केली होती. लोकशाहीच्या दृष्टीने आजचा निकाल अत्यंत घातक आहे. लोकशाही संपली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावं. लोकशाहीला आदरांजली वाहून बेबंदशाहीला सुरुवात झाल्याचं मोदींनी जाहीर करावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"यंत्रणांचा वापर करून जेवढा आमच्यावर अन्याय कराल त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. कोर्टातील निकालार्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देणं चुकीचं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आले. लोकशाहीचं वस्त्रहरण होत असलेलं आम्ही खपवून घेणार नाही. अनेक घटना तज्ज्ञांनी सांगितलं आहे की 16 आमदार अपात्र ठरतील. परंतु, न्यायालयाच्या निकाला आधीच हा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दोन महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील
"कदाचित एक दोन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागतील. त्यांना मुंबईला भिकेला लावून दिल्लीश्वरांच्या दारात उभे करायचं आहे. शिवसेना लेचीपेची नव्हती, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.