Uddhav Thackeray : पाठ केली की भाजप वार करायची संधी कधीही सोडत नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thacekray : उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर असून रायगडमधील माणगावमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपसह राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
माणगाव, रायगड : नितीश कुमारांनंतर (Nitish Kumar) आता उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) जाणार अशी चर्चा करतायत, मी का जाईन? यांची साथ 25 वर्ष अनुभवली, पाठ मागं केली की वार करायची संधी भाजप सोडत नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय. या ठिकाणच्या गद्दार खासदाराने विचारलं माझ्या मेळाव्याला किती गर्दी होणार? ही गर्दी आता त्यांना दिसेल, असा टोला उद्धव ठाकरेंनी सुनील तटकरे यांना लगावला. मला शिवाजी पार्कमध्ये झालेल्या शिवसेना दसरा मेळाव्याची आठवण झाली तेव्हा सुद्धा म्हणत होते गर्दी होणार नाही, जेव्हा मेळावा झाला तेव्हा गर्दी ओसंडून वाहत होती, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचं स्वप्न अनेक वेडे पाहतात, पण त्यांना बसता येत नाही, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. कल्यामध्येही मी दौरा केला, तिथे एक वडिल मोठे गद्दार आणि त्यांचा मुलगा खासदार छोटा गद्दार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला.
मी बोलतो ते करतो - उद्धव ठाकरे
कोस्टल रोडचं भूमिपूजन माझ्या हाताने झालं, आता त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करतायत, त्यांना ह तरी कळेल मी बोलतो ते करतो. पण उद्घाटन करताना कोस्टल रोडचं काम खरंच पूर्ण झालं आहे का ते एकदा बघा, नाहीतर राम मंदिरासारख घाईगडबडीमध्ये निवडणूक जवळ आलीये म्हणून उद्घाटन करताय, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
पंतप्रधान मोदींवर निशाणा
पंतप्रधान तुम्ही भूमिपूजन केलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारक कधी पूर्ण होणार, असा सवाल देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच हे पूर्ण कधी होणार ते 1 फूल दोन हाफ यांना विचारा, तुम्हीच त्याचं भूमिपूजन केलं होतं नाह? मग विचारा त्यांना त्याचं पुढे काय झालं, अशी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाचा देखील प्रश्न उपस्थित केलाय. जसा कोस्टल रोड पाहायला येताय, तसेच मुंबई गोवा हायवेवर सुद्धा फेरफेटका मारा, किती वर्ष झाली त्या कामाला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
पटेल आमच्यासाठी आजही लोहपुरुषच - उद्धव ठाकरे
सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर? हो आम्हाला पटेल पंतप्रधान म्हणून पटले असते, त्यांनी आरएसएसवर बंदी घालायची तयारी दाखवली होती. आम्ही पटेल यांना अजूनही लोहपुरुष मानतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.