Uddhav Thackeray In Konkan Visit :उद्धव ठाकरे इलेक्शन मोडवर! पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर, बारसूलाही देणार भेट
Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुढील महिन्यात 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणार आहेत.
Shiv Sena Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख (Shiv Sena UBT) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर असणार आहेत. उद्धव ठाकरे हे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसाच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे रिफायनरी विरोधी आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या बारसू या गावालाही भेट देणार आहेत.
उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार असल्याने त्याला विशेष महत्त्व आले आहे. कोकण दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्याशिवाय, देवदर्शनही करणार आहेत.
उद्धव यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, 4 फेब्रुवारी रोजी सावंतवाडी, कुडाळ, मालवण, आंगणेवाडी भराडी देवी दर्शन, कणकवली असा दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यानंतर नाईक यांच्या घरी त्यांचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे हे बारसू,राजापूर, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण या ठिकाणचा दौरा करणार आहेत.
एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचार शुभारंभ करत असताना आठ दिवसात उद्धव ठाकरे या लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत. एक आणि दोन फेब्रुवारीला रायगड लोकसभा मतदारसंघात दौरा केल्यानंतर चार आणि पाच फेब्रुवारीला उद्धव ठाकरे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत. कोकणच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचे विशेष लक्ष असून त्यानुसार निवडणूकच्या दृष्टिकोनातून तयारी केली जात आहे.
कोकण दौऱ्यात बारसू स्थानिकांच्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भेटी घेण्याची शक्यता आहे. बारसू मधील काही स्थानिकांची रिफायनरी विरोधी भूमिका असताना स्थानिकांच्या बाजूने उभा असल्याचं वेळोवेळी सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना नाणार ऐवजी रिफायनरीसाठी बारसू या गावात प्रकल्प करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवला होता. त्यानंतर बारसूमध्ये रिफायनरीच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर स्थानिकांनी रिफायनरी प्रकल्पाला मोठा विरोध सुरू केला आहे. त्यानंतर ठाकरे यांनी आम्ही ग्रामस्थांसोबत असल्याचे म्हटले.
शिवसैनिकांसोबत असल्याचा संदेश
राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळचे आमदार वैभव नाईक हे सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यात उद्धव ठाकरे हे वैभव नाईक यांच्या घरी फक्त बैठकच घेणार नाही तर मुक्कामही करणार आहेत. त्याशिवाय, राजापूरमध्ये राजन साळवी यांच्या समर्थनासाठी छोटेखानी सभाही घेण्याची शक्यता आहे. यातून शिवसेना ठाकरे गट हा आपल्या पदाधिकाऱ्यांच्या पाठिशी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहेत.