(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra College Update: 'या' तारखेपर्यंत राज्यात महाविद्यालयं सुरू? उदय सामंतांची मोठी घोषणा
20 जानेवारीपर्यंत 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालयं सुरू करण्याचा विचार असल्याचं उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला.
मुंबई : येत्या 20 जानेवारीपर्यंत 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील विद्यापीठांतर्गत येणारे महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज जाहीर केले आहे. प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे या आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला.
50 टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. प्राचार्य भरतीला दिलेल्या मान्यतेप्रमाणेच विद्यापीठातील इतर संवैधानिक रिक्त पदे आणि सहाय्यक प्राध्यापक पदे भरण्याचा निर्णय लवकर घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय मुंबईत
यावेळी उदय सामंत यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय मुंबईत स्थापन करण्यासाठी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली 12 जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सामंत यांनी सांगितलं की, तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या सर्व अभ्यासक्रमांना 15 जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. विधी प्रवेशांना ही सोमवार, मंगळवार या दिवशी आणखी 2 दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जिल्हास्तरीय, परराज्यात व सीमा भागात केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या दृष्टीने चर्चा व प्रयत्न सुरू आहेत. गोंडवाना विद्यापीठात अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्याला परवानगी देण्यात आली आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मॉडेल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.