अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत दोन मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला; प्रत्यक्ष मतदानाला अवघे काही तास
यंदाच्या निवडणुकीत मंत्रिमंडळातील सहकारी असलेले कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे विरोधी पॅनेलमध्ये आहेत. त्यामुळे या दोन्ही बलाढ्य नेत्यांनी आपआपले वर्चस्व पणाला लावले आहे.
अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी होऊ घातलेली निवडणूक अंतिम टण्यात पोहोचली आहे. प्रत्यक्ष मतदानाला अवघे काही तास उरले आहे. त्यामुळे निवडणुकीत अधिक रंगत चढली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकाराच्या निवडणूका जशा गाजतात, त्याचप्रमाणे यंदा अमरावती जिल्हा बँकेची निवडणूक सुद्धा प्रचंड चर्चेची ठरत आहे. या निवडणुकीत मतदार अमरावती जिल्ह्यातील असले तरीही लक्ष मात्र संपूर्ण राज्याचे लागले आहेत. कारण राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्री एकमेकांच्या विरोधी पॅनलमध्ये आहेत. सोबतच विद्यमान आमदार, माजी आमदारांचा प्रत्यक्ष सहभाग यंदा आहे. त्यामुळेच पहिल्यांदाच जिल्हा बँकेची निवडणूक पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राप्रमाणे चर्चेची ठरत आहे.
बँकेची निवडणूक 21 संचालक पदासाठी होणार होती. पण, 4 संचालक अविरोध झाल्याने आता 17 संचालक पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल असून जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांसह अन्य राजकीय आणि सहकारातील दिग्गजांचा त्या पॅनलमध्ये प्रत्यक्ष उमेदवार म्हणून सहभाग आहे. तर त्यांच्याविरुद्ध राज्यमंत्री बच्चू कडू, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनल आहे. परिवर्तन पॅनलमध्ये राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: उमेदवार आहेत. त्यांच्यासोबत संजय खोडके, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह सहकारातील दिग्गज मंडळी उमेदवार आहेत. तर भाजप आमदार प्रताप अडसड, माजी मंत्री भैय्यासाहेब देशमुख सारखे दिगग्ज पॅनलचं काम पाहत आहेत.
जवळपास अकरा वर्षानंतर जिल्हा बँकेची निवडणूक यंदा होत आहे. मागील अकरा वर्षांपासून बँकेवर काँग्रेसप्रणीत सत्ता होती. सहा महिन्यांपूर्वी बँकेतील 700 कोटी गुंतवणुकीचे प्रकरण समोर आले आणि कधी नव्हे ती बँक प्रचंड चर्चेत आली. संपूर्ण निवडणुकीत हाच मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. आणि त्यात ईडीने समन्स बजावल्याने चर्चा झाली. विरोधकांनी सुद्धा हाच मुद्दा उचलला आहे. वास्तविक यापूर्वी जिल्हा बँकेची निवडणूक कधीही इतकी उत्सुकतेची किंवा सर्वसामान्यांसाठी लक्षवेधी ठरली नव्हती. यातच यंदाच्या निवडणुकीत राज्य मंत्रिमंडळातील सहकारी असलेले कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे विरोधी पॅनेलमध्ये आहेत. त्यामुळे या दोन्ही बलाढ्य नेत्यांनी आपआपले वर्चस्व पणाला लावले आहे.
प्रचारा दरम्यान अनेक मुद्दे चर्चेला आले. बँकेचा कारभार नेमका चालतो कसा, हे अनेकांना त्यातून माहित पडले. आरोपाच्या अनेक फैरी झडल्या. परितर्वन पॅनलच्या उमेदवारांनी गेल्या 11 वर्षाच्या कारभारावर कागदोपत्री आक्षेप घेतले. अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले. त्याचे कागदपत्रही जाहीर केले. सहकार पॅनलच्या उमेदवारांनी गेल्या 11 वर्षात कसे चांगले काम केले, हे सांगण्याचा प्रयत्न केला. ते पटवून देण्यासाठी त्यांना जोर लावावा लागत असल्याचे चित्र दिसले. दोन्ही पॅनलने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. एकंदरीतच या निवडणुकीने जिल्ह्यातले राजकारण ढवळून निघाले आहे.