Measles Disease : औरंगाबाद जिल्ह्यातही गोवरची एन्ट्री, दोन बालके पॉझिटिव्ह; प्रशासन अलर्टवर
Aurangabad Measles Disease : औरंगाबादच्या जिल्ह्यात दोन बालके गोवर पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. दोन बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.
Aurangabad Measles Disease : मुंबईसह अनेक जिल्ह्यात गोवरचे ( Measles ) रुग्ण आढळून येत असतानाच आता, औरंगाबादमध्ये ( Aurangabad ) देखील गोवरची एन्ट्री झाली आहे. औरंगाबादच्या जिल्ह्यात दोन बालके गोवर पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. तर आणखी आठ रुग्णांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. एक 7 वर्षीय तर दुसरा 11 महिन्याच्या बालकाला गोवरची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
अनेक भागात गोवरचे संशयित रुग्ण
औरंगाबाद जिल्ह्यात देखील अनेक भागात गोवरचे संशयित रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान, 14 नोव्हेंबर रोजी 14 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यापैकी शहरातील एक सात वर्षीय बालकाला आणि सिल्लोड येथील चार वर्षीय बालिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर याच 14 संशयित रुग्णांच्या अहवालापैकी आणखी आठ रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आता या अहवालाकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे.
आरोग्य विभाग अलर्टवर
औरंगाबादमध्ये गोवरचे आत्तापर्यंत फक्त संशयित रुग्ण आढळून आले होते. मात्र आता दोन बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या आणि ग्रामीण भागातील आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. तसेच संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जात आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचं आव्हान देखील आरोग्य विभागाकडून केले जात असल्याचे पाहायला मिळते.
प्रशासनाकडून लसीकरणावर भर
मुंबईत गोवरचा उद्रेक पाहायला मिळत असताना औरंगाबाद प्रशासन सुद्धा अलर्ट झाला आहे. आरोग्य विभागाकडून यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्या जात आहे. तर याच वेळी गोवरच्या लसीकरणावर सुद्धा भर दिली जात आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून लसीकरण न झालेल्या बालकांची यादी करून त्यांना लस देण्याचे नियोजन केले जात आहे. तर ग्रामीण भागात देखील लसीकरण न झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी व लसीकरण करण्यासाठी सर्वेक्षण मोहिम सुरू करण्यात आली आहे.
आठ संशयितांचे अहवाल प्रतिक्षेत
औरंगाबादमध्ये आणखी आठ संशयित रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्रशासनाकडून घरोघरी जाऊन सर्दी, ताप, खोकला, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येणे यासारखी लक्षणे असलेल्या बालकांचे रक्त नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जात आहेत. नमुने मुंबई येथील हाफकिन लॅबोरेटरीकडे पाठविण्यात आले आहेत. संशयित रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली जात आहे, अशी माहितीही पालिका प्रशासनाने दिली आहे.