Beed : मावशीकडे आलेल्या दोन मुलींचा गोदापात्रेत बुडून मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना
माजलगाव तालुक्यातील महातपुरी गोदावरी पात्रात वाळू माफियांनी केलेल्या अनधिकृत रस्त्याने या दोन मुलीचा बळी घेतला आहे.
बीड: माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथे मावशीकडे आलेल्या दोन मावस बहिणीचा गोदावरीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. वाळूमाफियानी केलेल्या रस्त्यावरुन जात असताना खड्यात पडलेल्या स्वाती अरुण चव्हाण (वय 12) वर्ष हिला वाचवताना दिपाली गंगाधर बरवडे (वय 20) स्वातीने दिपालीला मिठ्ठी मारल्याने दोघी बहिणींचा पाण्यात बडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील मावशीकडे 15 दिवसांपूर्वी दिपाली आणि स्वाती आल्या होत्या. महातपुरी गावालगत असलेल्या गोदावरी नदी पात्रात आपल्या मावशीसोबत कपडे धुण्यासाठी सकाळी 9 वाजता गेल्या. या ठिकाणी वाळू माफियांनी गोदापात्रात रस्ता केला आहे. त्या दोघी पाण्यात आसलेल्या या रस्त्यावरुन चालत होत्या. पण मध्येच खड्डा आल्याने स्वाती अरुण चव्हाण हिचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दिपाली गंगाधर बरबडे गेली आसता पाण्यात घाबरलेल्या स्वातीने दिपालीच्या गळ्याला घठ्ठ मिठी मारली. त्यामुळे दिपालीला कसलीच हालचाल करता आली नसल्याने दोघी पाण्यात बुडाल्या.
गोदापात्रात असलेल्या इतर महिलांनी आरडाओरड केली. मात्र दोघी पाण्याच्या तळाला जाऊन बुडाल्या. यावर गावातील अनेक लोकांनी पाण्यात पोहून शोध घेतला असता बराच वेळ त्या सापडल्या नाहीत. शेवटी एका पोहणाऱ्याच्या पायाला लागल्याने त्याने त्यांना बाहेर काढले आणि ताबडतोब त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढले. त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या दोन्ही मावस बहिणीचा झालेला मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. मिठ्ठी मारलेल्या अवस्थेत दोघींचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
दिपाली ही माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात बीएससी वर्गात शिक्षण घेत होती. मयत झालेल्या दोघी मुली आपल्या काका-मावशीकडे आलेल्या होत्या. वाळू माफियांनी गोदावरी पात्रात केलेल्या अनधिकृत रस्त्याने या दोन मुलीचा बळी घेतला आहे.