एक्स्प्लोर
पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा करा : मुख्यमंत्री
बँक प्रतिनिधी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाला मुख्यमंत्र्यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
मुंबई : कर्जमाफी लाभार्थींच्या यादीतील सर्व त्रुटी दूर करुन तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी असे आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बँक प्रतिनिधी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाला मुख्यमंत्र्यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्याच्या ग्रीन लिस्टमध्ये ज्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यावर माहिती आणि तंत्रज्ञान विभाग आणि बँकांच्या चमुंनी एकत्रित बसून तोडगा काढावा. या यादीतील बिनचूक माहिती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून रक्कम जमा करण्यास सुरूवात करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
कर्जमाफीची रक्कम जमा करताना येणाऱ्या तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक झाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील सहकारी बँका आणि सहकार उपायुक्तांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.
18 ऑक्टोबरला साडे आठ लाख शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट तयार करण्यात आली. त्यामध्ये एकाच व्यक्तीच्या नावे दोन वेगवेगळी खाती अशा स्वरूपाच्या काही तांत्रिक बाबी निदर्शनास आल्या. त्यातच दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम हस्तांतरीत होण्यासाठी उशीर झाला.
बँकांच्या माहिती आणि तंत्रज्ञान तंत्रज्ञांनी राज्य शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या संपर्कात राहून एकत्रितपणे अडचणी दूर कराव्यात. यापुढे प्रत्येक बँकेने त्यांच्याकडील एक तज्ञ राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाकडे समन्वयासाठी नेमावा आणि येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर तातडीने मात करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
ज्या बँकांचं मुख्यालय पुण्यात आहे, अशा बँकांसाठी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने आपल्याकडील तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं. जेणे करून स्थानिक पातळीवरच प्रश्न सोडवता येतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी विभागनिहाय सहा तज्ञ नेमून समन्वयातून मार्ग काढावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement