Top Headlines Today : जाणून घ्या आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी
National News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज राज ठाकरेंची पुण्यात सभा, राज ठाकरेंच्या रडारवर कोण, बृजभूषण की मविआ सरकार?
आज सकाळी 10 वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या सभेला पोलीसांनी 13 अटींसह परवानगी दिली आहे. 'तूर्तास अयोध्या दौरा स्थगित..सविस्तर बोलू' असं ट्वीट राज ठाकरेंनी केलं होतं. त्यामुळे आज या विषयावर राज ठाकरे बोलतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी
वाढत्या महागाईत केंद्र सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. अबकारी कर कमी केल्यानं पेट्रोलच्या दरात 9.50 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपये घट झाली आहे. केंद्राकडून पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी 8 रुपये प्रति लीटर कमी होणार तर डिझेलवरील एक्साईज ड्युटी 6 रुपये प्रति लीटर कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात 9.50 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपये घट होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीटद्वारे ही घोषणा केली आहे.
तसेच, पहिल्या 12 गॅस सिलेंडरवर प्रत्येकी 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे सिलेंडरच्या किमतीही 200 रुपयांनी कमी होणार आहेत.
मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ
मान्सून अपडेट- मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. काल नैऋत्य मौसमी वाऱ्याची कोणतीही प्रगती बघायला मिळाली नाही. मात्र येत्या 27 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, त्याआधी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिवसभर बारामतीत असतील. सकाळी विविध विकास कामांची पाहणी करून बारामतीतील विद्या प्रतिष्ठान याठिकाणी जनता दरबार घेणार आहेत. त्यानंतर कोऱ्हाळे येथे अजित पवारांची सभा होणार आहे. त्यानंतर बारामतीतील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मालेगावला सामुदायिक विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थिती लावतील.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह नागपूर दौऱ्यावर
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 12 वाजता ते नागपुरात दाखल होतील. विमानतळावरच काही संरक्षण अधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार असून त्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वर्धा रोड स्थित निवासस्थानी भेट देणार आहेत.
अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याचा दुसरा दिवस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज अमित शाह दुपारी 1.30 वाजता चीन- भारत सीमेवरील जवानांशी संवाद साधणार आहेत.
आसाममध्ये मदतकार्य सुरू
पुरामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झालंय. आतापर्यंत सुमारे 7 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. या ठिकाणी एनडीआरएफ, वायुसेनेकडून मदतकार्य सुरु आहे.