Todays Headline 5th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार शक्य
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं रविवारी एका कार अपघातात दुर्दैवी निधन झालं. काल दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास ते अहमदाबादवरुन मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार शक्य आहे.
अमित शाह यांचा मुंबई दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असून ते महत्त्वाच्या बैठका आणि भेटी-गाठी घेतील. सकाळी साडे दहा वाजता अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतील. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जातील. अमित शाह आज भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेणार असून त्यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीविषयी रणनीती आखण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून ते या दरम्यान काही विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार आहेत. भाजपविरोधात सर्व विरोधक एकत्र आले तर 2024 साली भाजपला 50 जागाही मिळणार नसल्याचं ते म्हणाले होते.
बांग्लादेशच्या पंतप्रधान भारत दौऱ्यावर
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आजपासून 8 तारखेपर्यंत भारताच्या दौऱ्यावर आहेत. शेख हसिना या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. शेख हसिना या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही भेट घेणार आहेत.