Todays Headline 23th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज भाजपची प्रदेश कार्यकारिणी
भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी आज दिवसभर पनवेल येथे होणार आहे. सकाळी 9 वाजता भाजपचे पदाधिकारी एकत्र यायला सुरुवात होईल. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून 800 हून अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीचा समारोप होईल.
आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आज औरंगाबाद आणि नगरमध्ये
शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज औरंगाबाद आणि नगरमध्ये पोहोचणार आहे. सकाळी 11.30 वाजता आदित्य ठाकरेंचं पैठणमध्ये स्वागत होईल. दुपारी 2 वाजता ते गंगापूरमध्ये पोहोचतील. दुपारी 3 वाजता त्यांचे नेवासा शहरात शिवसैनिकांकडून जंगी स्वागत करण्यात येणार असून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 4.30 वाजता ते शिर्डी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून संध्याकाळी 5 वाजता शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतील आणि दर्शनानंतर मुंबईकडे रवाना होतील
आज मावळत्या राष्ट्रपतींना निरोप
देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज निरोप समारंभ होणार आहे. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान मोदींसह दोन्ही सभागृहाचे खासदार यावेळी उपस्थित राहतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलैला संपणार आहे. त्यानंतर कोविंद 12 जनपथवरील बंगल्यात आपला मुक्काम हलवतील.
विदर्भात पुढचे दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीत आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्याचा काही भाग आणि नाशिक, पालघरमध्येही आज पाऊस पडू शकतो.