Todays Headline 22th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई: ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्यातील ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आधी निवडणुका जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू करावे अशी सरकारची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला. पण हा निकाल देताना आधी निवडणुका जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुकीत हे आरक्षण लागू होणार नाही हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होत. कोर्टाचं म्हणणं होत की, ज्यावेळी आम्ही हा निकाल दिला, त्यावेळी ज्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तिथे आरक्षण लागू करता येणार नाही. पण यावरूनच राज्य सरकारने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
विधीमंडळ अधिवेशनाचा दुसरा आठवडा
राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून दुसऱ्या आठवड्यातील आज पहिला दिवस आहे. त्यामुळे शेतकरी, कायदा व सुव्यवस्था आणि सरकारने दिलेल्या स्थगिती संदर्भात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी सरकावरती मोठ्या प्रमाणात आरोप केले आहेत. यावर आज मुख्यमंत्री उत्तर देण्याची दाट शक्यता आहे. यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकतंच वर्धा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विद्युत तार तोंडात घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्यात पूर परिस्थिती असताना देखील शेतकऱ्यांना शासकीय मदत अजूनही पुरेशी मिळालेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावर आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. नुकतंच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दोन दिवसांचा दौरा केला आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर लवकरच ॲक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. याचाच पहिला टप्पा म्हणजे राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. यामध्ये ते आपल्या आगामी रणनिती बाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत आणि मार्गदर्शन देखील करणार आहेत.
भाजपच्या शहानवाज हुसेन यांच्या याचिकेवर सुनावणी
भाजपचे नेते शहानवाज हुसेन यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला असून त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आदेश दिला होता. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका हुसेन यांच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी करण्यात येणार आहे.
केजरीवाल आणि सिसोदिया एकदिवसीय गुजरातच्या दौऱ्यावर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया हे एकदिवसीय गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. ते या दरम्यान दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत.