Todays Headline 15th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत
पेट्रोल डिझेलचे नवे दर लागू
मध्यरात्रीपासून पेट्रोल डिझेलचे नवे दर लागू झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी पेट्रोल पाच रुपये आणि डिझेल तीन रुपयांनी कमी केल्याचा निर्णय काल जाहीर केला होता
आजपासून 75 दिवस मोफत बूस्टर डोस
केंद्र सरकारकडून आजपासून ‘कोविड लस अमृत महोत्सव’ अंतर्गत पुढचे 75 दिवस बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. सगळ्या महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत हा मोफत डोस मिळणार आहे.
आज देवेंद्र - राज यांची भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट होणार आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता दोघांची भेट होईल. दोन दिवसांपूर्वी पावसामुळे ही भेट रद्द झाली होती. नवीन सत्ता स्थापनेनंतर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
आज राज्यात कुठेही रेड अलर्ट नाही..मात्र, काही ठिकाणी पूरस्थिती कायम
आज रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे.
रुपयाची ऐतिहासिक पडझड
रुपया डॉलरच्या तुलनेत 79.88 वर बंद झालाय. रुपया डॉलरच्या तुलनेत लवकरच 80 रुपया पार करेल अशी शक्यता आहे. मागील काही महिन्यात रुपयाचे घटते मूल्य चिंताजनक जरी असले तरी आरबीआय रुपया अजूनही मजबूत असल्याचं सांगतेय. इतर 40 देशांच्या चलनाशी रुपया अजूनही पत टिकवून आहे. अन्यथा तो 90 पर्यंत खाली गेला आहे.
नागपुरात शरद पवार आणि संजय राऊत
नागपुरात संजय राऊत शिवसेनेच्या नागपूरमधील वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात बैठकांना उपस्थित राहणार आहेत. तसेच आज शरद पवार नागपुरात पोहचणार आहेत. दोघेही एकाच हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे नागपुरातही दोघांची भेट होणार आहे. एका कृषी पुरस्कारांच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी, शरद पवार आणि संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.
'देशात विदर्भासह 75 वेगळी राज्य करा' काँग्रेस मोदींना पत्र लिहिणार?
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली असून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही देशभरात सुरू आहे. मात्र, देशाची लोकसंख्या प्रचंड वाढली असून, राज्यांचे नियोजन अधिक योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी देशात देशात विदर्भासह 75 वेगळी राज्यं करा, अशा आशयाचे पत्र काँग्रेसकडून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे,अशी माहिती आशिष देशमुख यांनी दिली आहे. तसेच स्वतंत्र विदर्भाची मागणी अधिक तीव्र करण्यासाठी रणनीतिकार प्रशांत किशोर सक्रीय होणार असल्याचे सांगितले जात आहे.
केतकी चितळेची 22 गुन्हे रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका
शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेनं तिच्याविरोधातील 22 गुन्हे रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच एक नव्यानं अवमान याचिकाही केतकीच्या वतीनं दाखल केली जाणार आहे. या याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
आज रिलीज होणाऱ्या वेब सिरीज, सिनेमा
- मिताली राज च्या जीवनावर आधारित चित्रपट 'शाबाश मिठू' आज रिलीज होतोय. यात मिताली च्या भूमिकेत तापसी पन्नू आहे.
- 'हिट-द फस्र्ट केस' हा राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांचा सिनेमा आज रिलीज होतोय. हा सिनेमा 'हिट' या तेलुगू चित्रपटाचा रीमेक आहे.
- पंचायत फेम जितेंद्र कुमारचा जादूगर हा सिनेमा नेटफ्लीक्सवर रिलीज होणार आहे.
- कॉमिक्सतान' सीजन 3 अमेझॉनवर रिलीज होणार आहे.