Positive News : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाला वेशीबाहेर रोखणारं पंढरपुरातील चिंचणी गाव
पंढरपुरातील चिंचणी हे गाव कोरोना फ्री गावाचं मॉडेल ठरत आहे. कारण कोरोना संसर्गामुळे अख्खं जग अडचणीत आले असताना या गावाने गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाला वेशीबाहेर रोखण्याचा भीम पराक्रम करुन दाखवला आहे
पंढरपूर : सध्या देशभर फक्त चर्चा सुरु आहे ती हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर आणि बेडच्या तुटवड्याची. आता तहान लागल्यावर विहीर खणण्याचे प्रयत्न सर्वच स्तरातून केले जात आहेत. मात्र एक गाव आहे ज्याने 400 लोकसंख्या असूनही गावात सात हजारांपेक्षा जास्त झाडे लावत नैसर्गिक ऑक्सिजनचा अखंड साठा रोज जिवंत ठेवला आहे. आणि म्हणूनच कोरोना संसर्गामुळे अख्खं जग अडचणीत आले असताना या गावाने गेल्या दीड वर्षंपासून कोरोनाला वेशीबाहेर रोखायचा भीम पराक्रम करुन दाखवला आहे. सरकारी नियमांचे तंतोतंत पालन, स्वच्छता आणि प्रबोधन या त्रिसुत्रीमुळे गेल्या दीड वर्षात 400 लोकसंख्या असलेल्या या गावातील एकालाही लागण करायचे धाडस कोरोनाने केले नाही किंवा ग्रामस्थांनी तशी संधीच कोरोनाला मिळू दिलेली नाही .
ही किमया पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावाने साधली आहे. निसर्गावर टोकाचे प्रेम करणाऱ्या या 400 लोकवस्तीच्या गावाने गावात सात हजारांपेक्षा जास्त झाडे लावून गावाला वनराईत बदलले आहे. एक झाड साधारणपणे 250 पाऊंड ऑक्सिजन देते आणि दोन झाडे चार कुटुंबाला पुरेल एवढा प्राणवायू देतो. या गावाने निसर्गावर एवढे अमाप प्रेम केल्याने गावात 24 तास शुद्ध हवा, पक्ष्यांचा किलबिलाट अशा निसर्गरम्य चैतन्यमयी वातावरण कायम असतं. कोरोनाचा धोका सुरु झाल्यापासून ग्रामस्थांनी कोरोना म्हणजे काय याची माहिती करुन घेतली आणि शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन सुरु केले.
सुमारे 50 वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणग्रस्तांचे चिंचणी इथे पुनर्वसन झाले आणि ओसाड माळरानावर वसलेल्या येथील गावकऱ्यांनी गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आज गावात पाय ठेवला की गावात फिरणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडावर मास्क दिसतो, प्रत्येक जण सोशल डिस्टन्सचे पालन करताना दिसतो. नेहमीप्रमाणेच ग्रामस्थ शेतात कामं करतात. गावाला जे लागणारे सामान पंढरपूरमधून आणायचे असेल ती यादी घेऊन आठवड्यातून एक माणूस जातो आणि सर्व सामान घेऊन येतो. गावात आल्यावर योग्यरितीने सॅनिटाईज करुन सामानाचे वाटप होते. रोज ताजी फळे, भाजीपाला गावातच मिळतो. त्यामुळे सकस ताजा आहार, शुद्ध हवा आणि कोरोना नियमांचे पालन यामुळे चिंचणी गावाने कोरोनाला गावात एन्ट्रीच करु दिलेली नाही. ग्रामीण भागातील गावांनी चिंचणीचा आदर्श घेतल्यास गावाला कोरोना फ्री बनवण्याचा ध्यास नक्की पूर्ण होईल.