Coronavirus : काल दिवसभरात 12 जिल्हे अन् 12 महापालिका क्षेत्रात कोरोनामुळं एकही मृत्यू नाही, राज्याचा मृत्यूदर काय?
Coronavirus : काल दिवसभरात 12 जिल्हे आणि 12 महापालिका क्षेत्रात कोरोनामुळं एकही मृत्यू नाही, मात्र धोका टळला नसल्यानं खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Coronavirus : देशासह राज्यातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यातील 12 जिल्हे आणि 12 महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर, काल दिवसभरात कोरोनामुळे राज्यात 157 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र 12 जिल्हे आणि 12 महापालिका क्षेत्रातून दिलासा देणारी आकडेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. अशातच कोरोनाच्या आकडेवारीत घट दिसत असली तरी, धोका अद्याप टळलेला नाही, काळजी घ्या, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.
राज्यात काल (रविवारी) 6,479 रुग्णांची नोंद
राज्यात काल (रविवारी) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. राज्यात काल 6,479 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 4 हजार 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 60 लाख 94 हजार 896 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.59 टक्के झालं आहे. राज्यात काल कोरोनामुळे 157 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे.
'या' महापालिका क्षेत्रांत काल (रविवारी) एकही मृत्यू नाही
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, पालघर, रायगड, पनवेल, मालेगाव, धुळे, धुळे महानगरपालिका क्षेत्र, नंदुरबार या ठिकाणी काल कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. तर याशिवाय जालना, परभणी, परभणी महानगरपालिका क्षेत्र, लातूर, लातूर महानगरपालिका क्षेत्र, नांदेड महानगरपालिका क्षेत्र, अमरावती, अमरावती महानगरपालिका क्षेत्र, अकोला, अकोला महानगरपालिका क्षेत्र आणि यवतमाळ या जिल्ह्यांतही काल एकाही रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही.
सहा जिल्ह्यांमध्ये 100च्या खाली सक्रिय रुग्ण
राज्यात सध्या 78 हजार 962 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (8), हिंगोली (74), अमरावती (82) वाशिम (88), गोंदिया (98, ), गडचिरोली (15) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 680 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
नंदूरबार, नांदेड, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 888 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,81,85,350 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,10,194 (13.1 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,67,986 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,117 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Zika Virus: झिका व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री! काय आहेत या आजाराची लक्षणं, काय घ्यावी काळजी