Coronavirus in Maharashtra : एकीकडे नव्या वर्षाचं स्वागत सुरु असताना दुसरीकडे कोरोनाचं संकट घोंघावत आहे. कोरोनाचं धोका दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळतो आहे. त्यातच महाराष्ट्र आणि प्रामुख्याने मुंबईत रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढलेला पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. यामध्ये जानेवारी महिन्यात राज्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण दोन लाखांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


दरम्यान, सध्या करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांमध्ये एक धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. 70 टक्के रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आल्यानं प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी पत्रात म्हटले आहे की, ''राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या दोन लाख पार करणार असल्याची शक्यता आहे. 


आरोग्य सचिवांनी पुढे धोक्याचा इशारा देत म्हटलं आहे की, ''ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका नाही. ओमायक्रॉन सौम्य आहे असे समजू नका. लसीकरण न झालेल्या आणि इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांसाठी ओमायक्रॉन जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असेल. यामध्ये रुग्णसंख्याही वेगाने वाढेल. त्यामुळे लसीकरणावर भर देत लसीकरण वाढवा.'' 




राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासामध्ये राज्यात आठ हजारहून अधिक नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईमधून सर्वाधिक 5 हजार 631 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha