पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल रात्री उशीरा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्ससोबत बैठक झाली त्यानंतर बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मात्र, या निर्णयावर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी
शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. आज होणारी बैलगाडा शर्यत ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याने आढळराव पाटील यांनी काही काळ ठिय्या आंदोलन केले. यावेळी आढळरावांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात संघर्ष पाहायला मिळात आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात आज बैलगाडा शर्यती होणार होत्या. मात्र, ऐनवेळेस या शर्यती रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलाय. मात्र, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील टास्क फोर्सने हा निर्णय घेतल्याची आठवण करून दिली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन व बैलगाडामालक व बैलगाडाप्रेमी यांच्या भावनांचा आदर ठेवत 1 जानेवारी 2022 रोजी होणारी बैलगाडा शर्यत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी चिचोडी- आंबेगाव आणि नानोलीतर्फे चाकण ता. मावळ येथील बैलगाडा शर्यतीची परवानगी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश आहेत.
आढळराव पाटलांचे ठिय्या आंदोलन
बैलगाडा शर्यत अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अर्धा तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांनी मी भरविलेली बैलगाडा शर्यत हणून पाडली. ही मोठी शर्यत होईल आणि माझं नाव मोठं होईल म्हणून ही खेळी केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. अचानक शर्यत रद्द झाल्याने बैलगाडा मालक-चालक, शौकीन नाराजी व्यक्त करतायेत. जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी काल सायंकाळी सहा वाजता अहवाल मागवला. तेव्हा त्यांनी शर्यतीला संमती दिली आणि रात्री उशिरा अचानक शर्यतीला स्थगिती दिली. यावेळी पाटील यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
16 डिसेंबरला सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली होती. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली होती. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर 16 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- बंदी उठवल्यानंतर महाराष्ट्रातील पहिली बैलगाडा शर्यत सांगलीत होणार, नियम पाळून शर्यत भरवण्यास परवानगी
- Bailgada Sharyat: बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या अटी, नियम काय? ABP Majha