Pune Delivery Special Report | उच्चभ्रू सोसायटीत तरुणीवर अत्याचार, महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आयटी कंपनीत नोकरीला असलेल्या पंचवीस वर्षीय तरुणीवर तिच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार करण्यात आला. हे दुष्कृत्य करणारा इसम कुरियर डिलिव्हरी बॉय बनून तिच्या इमारतीत शिरला होता. पुण्याच्या कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली. डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून तो इमारतीत शिरला आणि एका फ्लॅटची बेल वाजवली. तरुणीने दरवाजा उघडल्यावर त्याने तिला बँकेचं पार्सल आल्याचं सांगितलं. पार्सल तिचं नसतानाही सही करण्याच्या बहाण्याने त्याने सेफ्टी डोअर उघडायला लावलं. सेफ्टी डोअर उघडताच तो घरात शिरला, तिच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला आणि अत्याचार केला. यानंतर तरुणी बेशुद्ध पडली. बेशुद्ध अवस्थेत असताना त्याने तिच्याच फोनमध्ये फोटो काढले आणि 'परत येईन' असा मेसेज लिहिला. हा नराधम अजूनही मोकाट आहे. पोलिसांच्या दहा टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुण्यातल्या उच्चभ्रू वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोंढवा अत्याचाराचा मुद्दा विधानसभेतही गाजला. यावर विधान परिषदेच्या उपसभापतींनी म्हटले आहे की, “सगळेच कुरियर बॉय असतात किंवा कुरियर बॉय गुन्हेगार आहे असं म्हणण्यापेक्षा असा समाज तंत्र किंवा गोष्टींचा आपल्याला गैरफायदा झालेला दिसताय.” उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरा असूनही एक इसम बिन्दासपणे शिरतो आणि अत्याचार करतो, ही बाब चिंताजनक आहे. या संवेदनशील प्रकरणाकडे आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची मागणी होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola