Pune Landslide News : पुण्याच्या खेड तालुक्यातील 'या' गावात डोंगराला भेगा; घाबरलेल्या 15 कुटुंबाकडून पुनर्वसनाची मागणी
पुणे जिल्ह्यात पुन्हा भूस्खलनाची भीती व्यक्त केली जात आहे. खेड तालुक्यातील पदरवाडी येथील डोंगराला तब्बल तीनशे मीटरच्या भेगा पडलेल्या आहेत.
Pune landslide News : पुणे जिल्ह्यात पुन्हा भूस्खलनाची भीती व्यक्त केली (landslide) जात आहे. खेड तालुक्यातील पदरवाडी येथील डोंगराला तब्बल तीनशे मीटरच्या भेगा पडलेल्या आहेत. सुदैवाने या गावातील पंधरा कुटुंब ही भेगा पडलेल्या डोंगराच्या वरच्या बाजूस वास्तव्यास आहेत. मात्र खालचा भाग कोसळला तर या घरांना धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
या पंधरा कुटुंबात साधारण ऐंशी व्यक्ती राहतात तर शंभरच्या आसपास दुभती जनावरं आहेत. पावसाचा जोर वाढला की या सर्वांची झोप उडून जाते. म्हणूनच मंगळवारी प्रशासनाने पुन्हा एकदा जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी तात्पुरते पुनर्वसन तातडीने करण्याची गरज असल्याचं नमूद केलं. माळीण, तळीये आणि इर्शाळवाडीमध्ये झालेली मोठी हानी आजही भरुन निघालेली नाही. हे पाहता इथे दुर्घटना घडण्याची वेळ न पाहता, सरकारने यांचं पुनर्वसन तातडीने करण्याची गरज असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
पदरवाडीच्या डोंगराला पडलेली ही भेग 1 ऑगस्टला ग्रामस्थांच्या नजरेत पडली. 2 ऑगस्टला ही बाब प्रशासनाच्या कानावर टाकण्यात आली. त्यानंतर प्रशासनाचे एक पथक घटनास्थळी रवाना झालं. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला ही इथला अहवाल पाठवण्यात आलेला आहे. मात्र या भागातील पावसाचा जोर पाहता नागरिकांची झोप उडालेली आहे. म्हणूनच काल प्रशासनाने पुन्हा एकदा प्रत्यक्ष पाहणी केली आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी या पंधरा कुटुंबीयांचं तात्पुरतं पुनर्वसन करण्याची गरज असल्याचं बीडीओ यांनी नमूद केलं.
मात्र ग्रामस्थांनी कायमस्वरुपी पुनर्वसन करावं अशी मागणी केलेली आहे. दुसरीकडे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने धोका नसल्याचं कळवलं आहे, अशी माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आम्ही तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवू असं आश्वासन बीडीओ विशाल शिंदेंनी दिली.
या गावात सगळे गावकरी नीट राहत होतो. मात्र काही दिवसांपासून गावात भूस्खलनाची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रात्र रात्र गावकरी झोपत नाही. अनेक गावकऱ्यांना आपल्या कुटुंबियांची चिंता लागलेली असते. आतापर्यंत भूस्खलन झालेल्या गावांची स्थिती पाहून तर अंगावर काटा येतो, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या-