(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतात भरणार पहिली 'भारतीय खेळणी जत्रा 2021', पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
देशातील पहिली भारतीय खेळणी जत्रा 2021 (India Toy Fair 2021) चे ऑनलाईन पद्धतीने 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई : देशभरात विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देण्याच्या हेतूने सोबतच या क्षेत्राला चालना मिळण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच देश पातळीवर पहिली भारतीय खेळणी जत्रा ऑनलाइन पद्धतीने भरणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या मार्फत देशातील पहिली भारतीय खेळणी जत्रा 2021 (India Toy Fair 2021) चे ऑनलाईन पद्धतीने 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 27 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या देशपातळीवर होणाऱ्या खेळणी जत्रेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई ,औरंगाबाद,अमरावती ,पुणे या चार विभागातील स्टॉल असून हे स्टॉल महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या व्यासपीठाच्या माध्यमातून या क्षेत्राशी निगडित उद्योजक आणि सरकार एकत्र येऊन या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी आकर्षित करण्यासाठी आणि निर्यातीला चालना देताना खेळण्यांचे उत्पादन व सोर्सिंग वाढवून भारताला जागतिक केंद्र कसे बनविता येईल, यावर चर्चा करण्याचा देखील हेतू आहे.
या खेळणी जत्रेत पारंपरिक खेळणीसोबत इलेक्ट्रॉनिक खेळणी, विविध आकर्षक प्राणी-पक्षी,कार्टून पात्रांच्या खेळणी,कोडे सोडविण्यासाठीचे खेळ इतर खेळ यांचा समावेश असणार आहे. सोबतच या जत्रेत देशातील- परदेशातील नावाजलेल्या व्यक्तींचे विविध चर्चासत्र, संभाषण सुद्धा असणार आहेत. देशभरातील सर्व राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातून 1000 पेक्षा जास्त सहभागी झाले आहेत. पहिल्या आभासी पद्धतीने होणाऱ्या खेळणी जत्रेचा आनंद घ्यावा व यासाठी यासाठी सर्व जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळातील शिक्षक, विद्यार्थ्यांनी 'भारतीय खेळणी जत्रा 2021' यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या जत्रेमध्ये सहभागी होण्यासाठी https://theindiatoyfair.in/ यावर General visitor म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे चे संचालक दिनकर टेमकर , सहसंचालक विकास गरड, खेळणी जत्रेच्या नोडल अधिकारी तेजस्विनी आळवेकर व प्रादेशिक विद्या प्राधिकरण,मुंबई उपसंचालक संघमित्रा त्रिभुवन यांनी केले आहे