(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात मनसेचं ठाण्यात आंदोलन
इंधर दरवाढीविरुद्ध मनसेने आज ठाण्यात आंदोलन केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केवळ चार आंदोलकांना परवानगी दिली होती. हातगाडीवर स्कूटर ढकलत आणून मनसेनं हे आंदोलन केलं.
ठाणे : ऐन कोरोनाच्या काळात आर्थिक अडचणीत भर पडली आहे. सलग 17 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये संतप्त वातावरण आहे. या दरवाढीचा विरुद्ध आज ठाणे हरी निवास सर्कल येथील तीन पेट्रोल पंप, तीन हात नाका येथील पेट्रोल पंपवर हे आंदोलन केले. मनसे कार्यकर्त्यांनी हातगाडीवर स्कूटर ठेऊन हातगाडी ढकलत पेट्रोल पंपावर आणून सरकारच्या दर वाढी चा निषेध केला. आंदोलन करताना केवळ चार आंदोलकांना पोलिसांनी परवानगी दिली होती त्यामुळे चार मनसैनिकांनी हे आंदोलन केले.
मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी केंद्र सरकारवर जनतेची लूट करण्याचा आरोप करत विचारले की, हेच का तुमचे अच्छे दिन का? कोरोना काळात संपूर्ण देश आर्थिक संकटाला सामोरं जातोय. लोकांकडे पोट भरण्यासाठी पैसे नाहीत आणि हे सरकार जनतेला दिलासा देण्याऐवजी महागाईचा बोझा वाढवत आहेत.
मनसे पेट्रोल दरवाढीविरुद्धात महाराष्ट्रात ठाणे, सांगली, रत्नागिरी इथे आंदोलन केलं. मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, सरकार कमीत कमी 10 रुपये पेट्रोल-डिझेलवर कमी करुन जनतेला दिलासा देऊ शकतं. पण सरकार हे करण्यास तयार नाही. सरकार प्रत्येकी एक लिटर पेट्रोल, डिझेलने 32-35 रुपये सरचार्ज, सेस, एक्साईज ड्युटी घेते. यातून सरकार 10 रुपये कमी करुन त्याचा लाभ जनतेला देऊ शकते, किमान या कोरोना काळात तरी पण ते सरकार करायला तयार नाही.
सलग सतराव्या दिवशी इंधनवाढ, दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर समान पातळीवर
एक लीटर पेट्रोल/डिझेलवर सरकार किती रुपये घेतं?
- 2014 पूर्वी पेट्रोलवर बेसिक एक्साईज ड्युटी 2.98 रुपये तर डिझेलवर 4.83 रुपये इतकी होती. त्यावेळी क्रूड ऑईलचे दर 140 डॉलर प्रति बॅरल होते.
- मोदी सरकार आल्यावर क्रूड ऑईलचे दर घसरले. मात्र नरेंद्र मोदींनी रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस म्हणून पेट्रोलवर प्रतिलिटर 10 रुपये लावले.
- SACD नावाचा सरचार्ज पेट्रोलवर 10 रुपये लावला.
- 6 मे 2020 ला सरकारनं पेट्रोलवरील रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेसमध्ये 8 रुपये वाढवले. म्हणजे आधीचे 10 + 8 = 18 रुपये.
- 6 मे 2020 ला सरकारनं पेट्रोलवरील SACD सरचार्ज 2 रुपयांनी वाढवला. म्हणजे आधीचे 10 + 2 = 12 रुपये
- केवळ पेट्रोलवर केंद्र सरकार सामान्य माणसाकडून एका लीटरला 30 रुपये + 2.98 रु. बेसिक एक्साईज ड्युटी म्हणजे एकूण 32 रुपये घेतं.
- 2014 मध्ये सत्तेत आल्यावर मोदी सरकारनं डिझेलवर रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस म्हणून प्रतिलिटर 10 रुपये घेतले.
- डिझेलवरही SACD नावाचा सरचार्ज लावलाय तो प्रतिलिटर 4 रुपये होता.
- 6 मे 2020 ला डिझेलवरील रोड आणि इन्फ्रा सेसमध्ये 8 रुपयांची वाढ केली म्हणजे आधीचे 10 + 8 = 18 रुपये.
- 6 मे 2020 ला डिझेलवरील SACD सरचार्ज 5 रुपयांनी वाढवला. म्हणजे आधीचे 10 + 5 = 15 रुपये, म्हणजे केवळ डिझेलवर केंद्र सरकार सामान्य माणसाकडून लिटरला 33 रुपये घेतं.