(Source: Poll of Polls)
TET Exam Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्यात IAS अधिकाऱ्याचा हात, कृषी खात्याच्या उपसचिवाला अटक
TET Exam Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले असून त्यामध्ये कृषी विभागाच्या उपसचिवाला अटक करण्यात आली आहे.
पुणे: शिक्षक परीक्षा घोटाळ्यात आता राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचा हात असल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. कृषी विभागाचे विद्यमान उपसचिव आणि टीईटी घोटाळा होत असताना शिक्षण विभागाचे उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केलीय.
टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला शिक्षण परिषदेकडून 2020 मधे ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. मात्र शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे याच्या सांगण्यावरून सुशील खोडवेकरने जीए टेक्नॉलॉजीज कंपनीला ब्लॅकलिस्ट मधून बाहेर काढले आणि या कंपनीला पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले.
हे सगळे करण्यासाठी उपसचिव सुशील खोडवेकरला पैसै मिळाल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालय. त्याचबरोबर या प्रकरणात अटक असलेला तुकाराम सुपेचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर हा वेळोवेळी मंत्रालयात जाऊन सुशील खोडवेकरकडून टीईटी घोटाळ्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करुन घेत होता. पोलिसांच्या तपासात हे उघड झाल्यानंतर खोडवेकरला ठाण्यातील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केलीय. यामुळे या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांचा तपास आता मंत्रालयापर्यंत पोहचलाय.
दरम्यान, शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचं सायबर पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालंय. त्यांची माहिती राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेला देण्यात आली आहे. तसेच या घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींनाही अटक करण्यात येईल, असं पुणे सायबर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- खळबळजनक! TETमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन केले पास
- TET Exam Scam : टीईटी परीक्षा घोटाळ्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय; शिक्षकांकडून मागवणार 'ही' माहिती
- TET Exam : सुपेच नाही तर ड्रायव्हरही करामती, आरोपींना थेट पुरवायचा हॉलतिकीट