गोपीनाथ गडावरील पंकजा मुंडे-एकनाथ खडसेंच्या भाषणात अहंकार दिसला, संघाची टीका
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यादरम्यान केलेल्या भाषणात पंकजा मुंडे आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेतृत्वावर टीका केली होती.
मुंबई : गोपीनाथगडावरील पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंच्या भाषणात अहंकार दिसला, असे म्हणत तरुण भारतमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंडे-खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. तरुण भारत हे संघाची विचारसरणी असणारं वर्तमानपत्र आहे. संघाने त्यातील अग्रलेखात म्हटले आहे की, पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे गोपीनाथगडावर जे बोलले ते राजकीयदृष्ट्या अयोग्य होतं,
गोपीनाथगडावर केलेल्या भाषणावेळी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व कुटुंबियांच्या पराभवाचं खापर पक्षनेतृत्वावर म्हणजेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी- अमित शाह यांच्यावर फोडलं आहे. परंतु तरुण भारतने याचे खंडण करत फडणवीस आणि मोदी-शाहांची पाठराखण केली आहे.
काय आहे तरुण भारतचा आग्रलेख गोपीनाथ गडावरील तोफगोळे अहंकार खाली पाहू देत नाही आणि खाली पाहिल्याशिवाय आत्मपरीक्षण करता येत नाही. कारण, अहंकारी व्यक्तीला समोरच्याचेच दोष दिसतात. त्यामुळे स्वत:चे काही चुकले का? स्वत:त काही कमतरता राहिली का, हे बघण्यासाठी संधीच मिळत नाही. गुरुवारी, परळीजवळील गोपीनाथ गडावर, गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, पंकजा मुंडे आणि एकनाथ ऊर्फ नाथाभाऊ खडसे यांनी जे मनोगत व्यक्त केले, त्यात या दोघांनी आपल्या सद्य:स्थितीचे परीक्षण केल्याचे अजिबात जाणवले नाही. नाथाभाऊंची मुलगी रोहिणी आणि पंकजा मुंडे पराभूत झाल्या आहेत. या पराभवाचे शल्य मनात ठेवूनच हे दोघेही बोलले. आपल्या पराभवाचे खापर या दोघांनीही, पक्षनेतृत्वावर म्हणजे देवेंद्र फडणवीसांवर आणि अप्रत्यक्षपणे मोदी-शाह या दिग्गज नेत्यांवर फोडले. नाथाभाऊ म्हणाले की, मी पक्षासाठी झिजलो, झटलो. पक्षाला खूप काही दिले. पंकजा म्हणाल्या की, माझ्या वडिलांनी पक्षाला खूप काही दिले. या दोघांच्या दाव्यात कणभरही अतिशयोक्ती नाही. परंतु, हे दोघेही हे विसरले की, पक्षानेही तुम्हाला काय दिले, हे जनताही लाखो डोळ्यांनी बघत असते. आपण कुणाला काय दिले, कुणासाठी काय काय केले, हे आपण आपल्या तोंडाने सांगायचे नसते, अगदी राजकारणातही. उलट, ते लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि आपण, पक्षाने मला किती दिले, याचीच सतत जाहीर उजळणी करायची असते. हा विधिनिषेध सर्वसामान्य कार्यकर्त्याने पाळला नाही तर एकवेळ चालून जाते. परंतु, जेव्हा आपण स्वत:ला 'लोकांच्या मनातील मुख्यमंत्री' असे नामाभिधान लावून घेतो किंवा 'मुंडेसाहेब असते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो', असे आत्ममुग्ध विधान करतो, तेव्हा तर हा विधिनिषेध कटाक्षाने पाळायचा असतो. अगदी आजच्या प्रचलित भाषेत बोलायचे, तर या मेळाव्यात पंकजा मुंडे व नाथाभाऊ जे काही बोलले, ते 'पोलिटिकली इन्करेक्ट’'(राजकीयदृष्ट्या अयोग्य) असेच होते.