पुनर्विकासानंतर तळीये गाव राज्यातील आदर्श गाव; 13 हेक्टर वरती तब्बल 261 घरांचा पुनर्विकास होणार
तळीये गावाचा पुनर्विकास करताना गावात अंगणवाडी, शाळा आणि हॉस्पिटल बांधलं जाणार आहे. सध्या तळीये गावाच्या पुनर्विकासातील घरं गुजरातच्या भूज येथील सिटेक कंपनीमध्ये तयार केली जात आहेत.
रायगड : रायगड जिल्ह्यातील तळीये गावाचा 13 हेक्टर वरती म्हाडा पुनर्विकास करणार आहे. फक्त तळीये गावाचं नाही तर सर्व सातही वाड्यांमधील एकूण 261 घरांची पुनर्बांधणी म्हाडा करणार आहे. याआधी फक्त 63 घरांची म्हाडा पुनर्बांधणी करणार होती. या संदर्भात काल (मंगळवारी) मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीला रायगड जिल्ह्यच्या पालकमंत्री अदिती तटकरे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर,मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता,रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होत्या. या गावाचा पुनर्विकास करताना राज्यातील एक आदर्श गाव म्हणून याकडे पाहिलं जाईल असं जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाही बोलताना म्हटलं आहे.
तळीये गावाचा पुनर्विकास करताना गावात अंगणवाडी, शाळा आणि आरोग्याची सुविधा म्हणून हॉस्पिटल ही बांधल जाणार आहे. सध्या तळीये गावाच्या पुनर्विकासातील घरं गुजरातच्या भूज येथील सिटेक कंपनीमध्ये तयार केली जात आहेत. काही दिवसात ही घरं मुंबईत आणली जाणार आहेत. येत्या आठवड्याभरात रायगडचे जिल्हाधिकारी आणि म्हाडाचे अधिकारी तळीये गावाला भेट देतील आणि तेथील जागेचा मार्ग मोकळा केला जाईल. जागा हस्तांतरित झाल्यानंतर युद्धपातळीवर या घरांच्या पुनर्विकासाला गती दिली जाईल. नव्या तंत्रज्ञानाची ही घरे असणार आहेत. ज्या प्रकारे कोकणात वातावरण आहे. त्या सर्व वातावरणात ही घर टिकतील अशा स्वरूपाचे घर बनवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात तळीये गाव वसलेल असेल असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल आहे.
तळीये गावच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली, जितेंद्र आव्हाडांची घोषणा
रायगडमधील तळीये गावात दरड कोसळून 42 नागरिकांचा मृत्यू झाल्या. येथील अनेक घरं दरडीखाली गाडले गेले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या सहमतीनं हा निर्णय घेतल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं की, "कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती."