सोलापुरात राष्ट्रवादीच्या सहा झेडपी सदस्यांचे निलंबन, निवडणुकीत भाजपला साथ दिल्याने कारवाई
सोलापुरात राष्टवादी काँग्रेसकडून सहा जिल्हा परिषद सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. निवडणुकीत भाजपला साथ दिल्याप्रकरणी ही कारवाई कारवाई करण्यात आली आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप समविचारी आघाडीला साथ दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी ही कारवाई केली आहे. स्वरुपाराणी मोहिते पाटील, शितल देवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, सुनंदा फुले, गणेश पाटील, मंगल वाघमोडे या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे सर्व सदस्य माळशिरस तालुक्यातून असून मोहिते-पाटील गटातील आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सभाग्रहात राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी सदस्यांना व्हीप बजावण्याची परवानगी मागितली. मात्र पीठासीन अधिकार्यांनी सभागृहात व्हीप बजावता येत नसल्याचे सांगितल्यानंतरही उमेश पाटील यांनी पक्षादेश सभागृहात वाचून दाखवला. मात्र हा आदेश झुगारत मोहिते-पाटील यांच्या गटातील सहा सदस्यांनी भाजप समविचारी आघाडीला पाठिंबा दिला. याच पाठिंब्यावर भाजप समविचारी आघाडी जिल्हा परिषदेमध्ये विजयी झाली.
पक्षादेश डावलून समर्थन दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षातर्फे पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान व्हीप बजावल्यानंतर विरोधात मतदान केल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्यत्व देखील रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी तर्फे करण्यात आली आहे. मात्र हा व्हीप ग्राह्य धरून जिल्हाधिकारी या सहा सदस्यांवर कारवाई करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मोहिते-पाटील यांनी भाजपच्या राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता. मोहिते-पाटलांचा जोरावरती माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजप विजयी झाली होती. मात्र नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या बैठकीत आपण राष्ट्रवादीतच आहोत, असं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केल्यानंतर सगळेच चक्रावले होते. मात्र नंतर खुलासा करत आपण असं वक्तव्य केलंच नाही, अशी भूमिका विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली होती. त्यामुळे मोहिते-पाटील नेमके राष्ट्रवादीत की भाजपत हा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे निलंबन झालेल्या सहा सदस्यांपैकी दोन सदस्य हे मोहिते-पाटील यांच्या कुटुंबातील आहेत.