केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, येत्या आठ दिवसात आक्रमक होणार : राजू शेट्टी
केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी आक्रमक होणार असल्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलाय.
नंदुरबार : एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून देण्यात येणाऱ्या नोटीस संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. केंद्राने घेतलेला निर्णय चांगला असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. मात्र, पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली आहे. तसेच केंद्र आणि राज्याने राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अजूनही शेतकऱ्यांना कुठलेही प्रकारचे अनुदान मिळाले नसून शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तर विमा कंपनी आपले भांडे भरण्याचं काम करत असल्याचा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.
एफआरपी संदर्भात भूमिका
केंद्र सरकारने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला असून राज्यांकडून मत मागविण्यात येत आहे. एफआरपी कोणत्याही प्रकारात तीन तुकडे देण्यात येऊ नये, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. तसेच केंद्र सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने जास्तीचा भाव देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून नोटीस दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा भाव मिळत नव्हता. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचा फायदा होईल. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित व्हावी, अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुरघोडीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून या सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये कुरघोडी असल्याचे दिसून येते. ऊर्जा खाते हे काँग्रेसकडे असल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पूर परिस्थितीची पाहणी करताना वीज जोडणी कट केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. आता अचानक वीज जोडणी का कट केली जात आहे. अर्थ विभाग त्याला परवानगी का देत नाही? अशी गत आहे. दोन रेड्यांच्या टकरीमध्ये कुंपणाचा चुराडा होत असल्याची गत शेतकऱ्याची होत असल्याचे शेट्टी म्हणाले.
राज्यात चार पक्षांच्या टोळ्या सक्रिय यंत्रणाचा दुरुपयोग
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं कोणत्याही राजकीय पक्षाला काही पडलेले नाही. आर्यन खानचा जामीन कधी होईल हे सर्वांसाठी महत्वाचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून यंत्रणांचा अतिवापर होत असून हे राज्यासाठी चांगले नसून यंत्रणा ह्या कार्यकर्त्या सारख्या वागू लागले असल्याचा टोला राजू शेट्टी यांनी यावेळी लगावला.