(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानपरिषदेची जागा कार्यकर्त्यांना दिली असती तर योग्य ठरलं असतं, स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य
राजू शेट्टी यांनी जो निर्णय घेतला आहे, तो निर्णय जर कार्यकर्त्यांना सांगून घेतला असता तर काहीच प्रश्न नव्हता. पण 20-20 वर्षे संघटनेसाठी काम करुन जर काहीच सन्मान होत नसेल तर काय करायचे? असा सवाल स्वाभिनामीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील केलाय.
कोल्हापूर : ऊस दराच्या मुद्द्यावर जन्माला आलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांचं विधानपरिषदेसाठी निश्चित झालेलं नाव यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना चर्चेत आहे. राजू शेट्टी यांनी सर्व पदं उपभोगली असून कार्यकर्त्यांचा सन्मान करणं गरजेचं होतं असा सूर बाहेर आहे.
एक वेळ माझा बळी देईन पण चळवळ जिवंत ठेवेन, असं उद्विघ्न वाक्य माजी खासदार राजू शेट्टी यांना म्हणावं लागलं. विधानपरिषदेची मिळालेली जागा यासाठी कारण ठरलं आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी राजू शेट्टी यांचं नाव फायनल झालं. बरोबर हाच निर्णय काही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना खटकला. राजू शेट्टी यांनी जो निर्णय घेतला आहे, तो निर्णय जर कार्यकर्त्यांना सांगून घेतला असता तर काहीच प्रश्न नव्हता. पण 20-20 वर्षे संघटनेसाठी काम करुन जर काहीच सन्मान होत नसेल तर काय करायचे? असा सवाल स्वाभिनामीच्या प्रदेशाध्यक्षांनी केलाय. त्यामुळेच राजू शेट्टी कमालीची डिस्टर्ब झाले.
राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक शिलेदार वेगवेगळ्या कारणांनी संघटना सोडून गेले. मात्र काही नेते संघटना वाढीसाठी झटत राहिले. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील असतील किंवा सावकार मादनाईक असतील. यांनी संघटनेच्या सुरुवातीपासून राजू शेट्टी यांना सहकार्य केलं आणि शेतकऱ्यांचा एक खंबीर नेता उभं केला. मात्र विधानपरिषदेची जागा कार्यकर्त्यांना दिली असती तर योग्य ठरलं असतं, असं मत प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी व्यक्त केलं.
नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नको : राजू शेट्टी
या वादाचा फायदा घेऊन अनेकांनी संघटना फुटण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता व्यक्त केली. राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावरुन एक भावनिक पोस्ट केली. बाहेरच्या लोकांच्या तलवारीचे घाव सहन केले. पण घराच्या लोकांच्या कट्यारीचा घाव जिव्हाळी लागतो. त्यामुळे विधानपरिषदेची ब्याद आम्हाला नकोच, असं शेट्टी यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटलं.