एक्स्प्लोर
उपेक्षित लेखक! 7 पुस्तकं लिहिणाऱ्या शंकर कवळेंचा पोटासाठी संघर्ष
साताऱ्यातील कराड तालुक्यातील मरळी गावात राहणारे शंकर कवळे. हालाखीच्या परिस्थितीतमुळे ते सध्या गवंडी काम करतात. ज्या हाताने सध्या ते पाटी भरतात, त्याच हाताने कधीकाळी त्यांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल सात पुस्तके लिहिली आहेत.
![उपेक्षित लेखक! 7 पुस्तकं लिहिणाऱ्या शंकर कवळेंचा पोटासाठी संघर्ष Struggle Of Shankar Kawale Who Wrote 7 Books Latest Updates उपेक्षित लेखक! 7 पुस्तकं लिहिणाऱ्या शंकर कवळेंचा पोटासाठी संघर्ष](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/05144218/books-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा : तीन कादंबऱ्या, तीन कथासंग्रह आणि एक चरित्र... इतकं सारं लेखन करणारा लेखक कोणत्या उंचीचा असू शकतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र, एवढं लेखन करणारा लेख गवंड्याच्या हाताखाली काम करतोय, असं सांगतिलं तर...? ऐकायला गंभीर आणि स्वीकारायला थोडं कठीण जातंय ना? मात्र, हे खरं आहे. साताऱ्यात एक प्रतिभावान लेखक असंच जिंणं जगतोय. किंबहुना, संसाराचा गाडा हाकण्यासाठी आणि डोक्यावरील छपरासाठी त्याला असं जिणं जगावं लागतं आहे.
साताऱ्यातील कराड तालुक्यातील मरळी गावात राहणारे शंकर कवळे. हालाखीच्या परिस्थितीतमुळे ते सध्या गवंडी काम करतात. ज्या हाताने सध्या ते गवंडी कामासाठी पडेल ते काम करतात, त्याच हाताने कधीकाळी त्यांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल सात पुस्तके लिहिली आहेत. अजूनही लिहिण्याची उमेद, कल्पकता, लेखनक्षमता कमी झाली नाही. मात्र, संसाराचा गाडा हाकणं, हे त्यांच्यासमोरील सध्या मोठं आव्हान आहे.
मरळी गावात अगदी टोकाला असलेल्या मागास वस्तीत शंकर कवळेंचं घर आहे. शिक्षण अवघं बारावीपर्यंतच झालंय. घरच्या परिस्थितीमुळे पुढे शिकता आलं नाही. लोकांच्या गाई-म्हशी संभाळता-सांभाळता त्यांना पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण झाली आणि त्यांनी हातात पेन घेऊन लिहायला सुरुवात केली.
एक..दोन..तीन... करता करता एकूण सात पुस्तकांचं लेखन शंकर कवळे यांच्या हातून झालं. कधी मंदिराच्या उंबरठ्यावर, तर कधी घराच्या उंबरठ्यावर बसून लेखन केलं.
आरती, अनुराग आणि बिजली या तीन कादंबऱ्या, तर माणुसकीचा मोठपणा, खरा माणूस, बुद्धिमान बिरबल हे तीन कथासंग्रह आणि अण्णाभाऊ साठेंचं चरित्र... अशी शंकर कवळे यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
सुरुवातीला लिखाणाची ओढ वाढत असताना वडिलांच्या शिव्या खाव्या लागायच्या. कारण लेखन करायला घेतल्यास घरचं काम करणं थांबायचं. मात्र, पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर घरातल्यांनाही आनंद झाला आणि त्यांनी शंकर यांच्या लेखनाला पाठिंबा दिला. मात्र, परिस्थिती पाठिंबा देण्यास तयार नव्हती.
2008 साली शंकर कवळेंचं लग्न झालं आणि संसाराची जबाबदारी खांद्यावर आली. त्यामुळे शंकर यांच्या लिखाणात खंड पडत गेला. कारण आर्थिक पातळीवर ते खचत गेले.
शंकर कवळेंकडे एक गुंठाही जमीन नाही. दोन मुलांचे वडील असलेल्या शंकर कवळेंची आपल्या संसाराचा गाडा हाकताना दमछाक सुरु झाली. मिळेल ते काम ते करु लागले. ते सध्या गवंडी काम करतात. रोजची कमाई 200 ते 300 रुपये.
लिहिलेल्या पुस्तकातून तुटपुंजी रक्कम त्यांना घरपोच मिळते. मात्र, तेवढ्यात काहीच भागत नाही. तशी पत्नीही कुटुंबं चालवण्यासाठी हातभार लावते. संसार चालवण्यासाठी बिकट परिस्थिती निर्माण झालेली असतानाही, त्यांची पत्नी मात्र त्यांच्या लिखाणावर खुश आहे.
हजारो-लाखो रुपये खर्चून साहित्य संमेलनं भरवणारी मंडळी आणि राज्याचं सास्कृतिक मंत्रालय शंकर कवळे यांच्यासारख्या अस्सल मातीतल्या लेखकाची दखल घेणार का, हाच खरा प्रश्न आहे.
पाहा व्हिडीओ -
![उपेक्षित लेखक! 7 पुस्तकं लिहिणाऱ्या शंकर कवळेंचा पोटासाठी संघर्ष](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/05144221/books-3-580x395.jpg)
![books](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/05144223/books-580x395.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)