Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा; सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणी जामीन मंजूर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 115 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई: सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणातील सर्व 115 जणांनांही जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी जामीन मिळावा यासाठी सदावर्तेंनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणात आरोप असलेल्या 115 जणांना जरी जामीन मिळाला असला तरी आता त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन घेणार का असा सवाल विचारण्यात येत आहे.
दरम्यान, अकोल्याच्या अकोट न्यायालयाकडूनही अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अकोट न्यायालयाचा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता दोघांना ही दिलासा देत अकोट न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत आहेत. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी 8 एप्रिल रोजी दुपारच्या वेळी अचानकपणे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या दिशेनं चपला भरकावल्या तर महिला आंदोलकांनीही पवार कुटुंबियांविरोधात जोरदार नारेबाजी केली होती. साधराण तासाभराच्या प्रयत्नांनंतर पोलीसांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं होतं. याप्रकरणी गावदेवी पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- माझ्याविरोधात तक्रार करण्यासाठी मुहूर्त शोधला का? सदावर्तेंचा युक्तिवाद; कोल्हापूर कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी
- सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरण: जयश्री पाटील यांना मोठा दिलासा, 29 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण
- अॅड. गुणरत्न सदावर्तेंचे महाराष्ट्रभ्रमण सुरूचं, कोल्हापूर पोलिसांना मिळाला ताबा