माझ्याविरोधात तक्रार करण्यासाठी मुहूर्त शोधला का? सदावर्तेंचा युक्तिवाद; कोल्हापूर कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी
Gunratna Sadavarte : माझ्याविरोधात आताच तक्रारी का दाखल होत आहेत, हा मुहूर्त कशातून शोधला असा युक्तिवाद अॅड. सदावर्ते यांनी कोल्हापूर कोर्टात केला. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Gunratna Sadavarte : राज्यभरात विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आले. माझ्याविरोधात इतक्या उशिराने तक्रार दाखल का केली, हा मुहूर्त कशातून शोधला असा युक्तिवाद अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल कोल्हापूर शाहुपुरीत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सदावर्ते यांनीदेखील आपली बाजू मांडली. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून सदावर्ते यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदावर्ते यांनी वारंवार मराठा समाज आणि न्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. या मागे आणखी कोण आहेत. कोणाच्या साथीने ते अशी वक्तव्य करतात याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे तक्रारदारांचे वकील शिवाजीराव राणे यांनी सांगितले. तर, सदावर्ते यांनी वक्तव्य केल्यानंतर जातीय तेढ निर्माण झाला नाही. जे काही बोलले ते माध्यमांमध्ये आहे. त्यासाठी पोलीस कोठडी कशाला हवी असे सदावर्ते यांचे वकील पीटर बारदेस्कर यांनी म्हटले.
आरोपी अॅड. सदावर्ते यांनीदेखील आपली बाजू मांडताना तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीतील चुका न्यायलयाच्या निदर्शनास आणून दिल्या. तक्रार आताच का दाखल केली? हा मुहूर्त कशातून शोधला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सदावर्ते जेलमध्ये आहे तक्रारी दाखल करा असा मेसेज सगळयांना देणात आला. त्यानंतर तक्रारी दाखल होत असल्याचे त्यांनी म्हटले. न्यायालयातील युक्तिवादावर माध्यमांनी प्रश्न केल्यानंतर मी उत्तर दिले होते. उपलब्ध असलेल्या व्हिडिओनुसार तपास करता येऊ शकतो असेही त्यांनी म्हटले. मी केलेल्या वक्तव्यामुळे दंगल होईल असे कारण देण्यात आले. मात्र, अद्याप दंगल झाली नसल्याचेही सदावर्ते यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: