ST Protest : शरद पवार यांच्या निवासस्थानावरील आंदोलन प्रकरणी आरोपींना वकीलच नाही, आठही जणांना पोलीस कोठडी; आज कोर्टात काय घडलं?
ST Protest : शरद पवार निवासस्थानी आंदोलनप्रकरणी आज न्यायालयात काही आरोपी आणण्यात आले होते. मात्र त्यांची बाजू मांडण्यासाठी वकीलच उपलब्ध नव्हते. अखेरीस न्यायाधीशांनी या सर्व आरोपींना वकील देण्याचे आदेश दिले त्यानंतर ऐनवेळी अॅड. कमलेश मोरे यांनी त्यांचं वकीलपत्र स्वीकारलं.
मुंबई : शरद पवार यांच्या निवासस्थानावरील आंदोलना प्रकरणी कोर्टात हजर केलेल्या आठही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेय. अभिषेक पाटील, मोहम्मद ताजुद्दीन आणि सविता पवार यांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील अॅड सदावर्ते पोलीस कोठडीत असल्यानं आता एसटी कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. शरद पवार निवासस्थानी आंदोलनप्रकरणी आज न्यायालयात काही आरोपी आणण्यात आले होते. मात्र त्यांची बाजू मांडण्यासाठी वकीलच उपलब्ध नव्हते. अखेरीस न्यायाधीशांनी या सर्व आरोपींना वकील देण्याचे आदेश दिले त्यानंतर अगदी ऐनवेळी अॅड. कमलेश मोरे यांनी त्यांचं वकीलपत्र स्वीकारलं.
एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी वकील न्यायालयात हजर नव्हते. न्यायाधीशांनी वकील देण्याचं सांगितलं. वेळेवर वकील कमलेश मोरे यांनी कर्मचाऱ्यांचं वकिलपत्र घेतलं. सरकारी वकील प्रदीप घरत यांना देखील कोर्टात पोहोचायला उशीर झाल्यानं सुनावणी उशीरा सुरू झाली. काल पकडण्यात आलेला सच्चिदानंद पुरीला देखील न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तीवाद
7 एप्रिल रोजी सदावर्ते यांच्याकडे मिटींग झाली. यात हे षडयंत्र शिजले गेले. सच्चिदानंद पुरी याने हे तपासादरम्यान सांगितलंय. पोलिसांना घराबाहेर सीसीटीव्ही मिळाले आहेत. मात्र आता घर लॉक आहेत. आर्थिकबाबतीत देखील काही गुन्हे दाखल झाले आहेत. सातारा आणि अकोटमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत अभिषेक पाटील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय तो शरद पवार यांच्या घराकडे बोट दाखवतोय. सविता पवार देखील सीसीटीव्हीत सगळीकडे दिसत आहेत . मात्र त्यांचा फोन लॉक आहे आणि त्यातून काही माहिती हाती लागू शकते. मात्र त्या पासवर्ड देत नाही आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की, 6 तारखेला कोअर कमिटीची बैठक झाली. हे चारही लोकं बैठकीला हजर होते. सच्चिदानंद पुरी देखील युट्यूब चॅनल चालवायचा. सर्व कम्युनिकेशन तिथून करायचा. प्रोव्होकेटिव्ह भाषणं द्यायचा. शिवगर्जना नावाचं ह्याचं चॅनल आहे. या चार जणांचा कोअर कमिटीत सहभाग तर होताच सोबत प्लान एक्झिक्युशनमध्ये देखील सहभाग होता. त्यामुळे या चारही जणांची कस्टडी हवी आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील कमलेश मोरे यांचा युक्तीवाद
सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे मोबाईल जमा आहेत. त्यामुळे आता रिमांडची काय गरज आहे. आम्हाला जे विचारायचे होते ते पहिल्या दिवशी आंदोलनादिवशीच चौकशी झाली आहे. दोघांबद्दल सरकारी वकील बोलले मात्र इतर दोघांबद्दल ते बोलले नाहीत. आमचा रोल त्यांनी सांगितला नाही. आम्ही दोघे मागील सहा महिन्यापासून यायचो एसटीची केस कोर्टात सुरु असल्याने याचा अर्थ हा नाही की आम्हीही तिथे गेलो. सच्चिदानंद पुरीबद्दल सरकारी वकील बोलले मात्र युट्यूबवरुन भाषण करणं वगैरे ते त्याचं स्कील आहे आणि आयटी ॲक्ट खाली कुठेही गुन्हा नोंद नाही आहे. ज्या वेळी घटना घडली त्यावेळी आरोपी तिथे उपस्थित नव्हता. त्यामुळे त्याचा सहभाग आहे, हे म्हणणं चुकीचं. ड्रायव्हरबद्दल बोलायचं तर मोबाइलचा डाटा रिकव्हर करण्यात येतो.
संबंधित बातमी: