एक्स्प्लोर
Advertisement
कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी एसटी धावणार
कोटामध्ये आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करणारे जवळपास दीड हजार ते दोन हजार महाराष्ट्रीयन विद्यार्थी अडकले आहेत. राजस्थानमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आता एसटीची मदत घेतली जाणार आहे.
मुंबई: राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून महाराष्ट्रात आणले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. कोटा येथून हे विद्यार्थी आणताना आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन होणार आहे, अशी देखील माहिती आहे.
सरकारने कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याबाबत घोषणा केली होती. मात्र त्यांना आणणार कसं? याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र आता महाराष्ट्राची लालपरी या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धावणार असल्यानं पालकांची बऱ्याचअंशी चिंता मिटली आहे.
राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार कोटा इथे असलेल्या काही विद्यार्थी वाहनांची व्यवस्था केली होती. त्यांना प्रवासासाठी परवानगी हवी होती. राज्य सरकारने ती परवानगी मिळवून दिली आहे. त्यामुळे वाहनांची व्यवस्था असलेले काही विद्यार्थी कोटा इथून निघाले आहेत. हे विद्यार्थी थेट त्यांच्या जिल्ह्यात येतील. इतर विद्यार्थ्यांसाठी राज्यातून एसटीच्या बसेस जाणार आहेत. ह्या बसेस विद्यार्थी ज्या जिल्ह्यात आहेत तिथे त्यांना सोडणार आहेत.
आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेच्या तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा येथे जातात. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो. यावर्षी कोटा येथे शिकायला गेलेल्या जवळपास दीड हजार ते दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला. पहिला लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत संपणार होता. त्यावेळेस या विद्यार्थ्यांना 14 एप्रिलपर्यंत येथेच राहा, मग पुढे पाहू, असे तेथील शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. यानुसार हे विद्यार्थी तेथेच थांबले. मात्र पुन्हा 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी चर्चा केली.
या संदर्भांत राज्याने विद्यार्थ्यांच्या स्थलांतराबाबत राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याला पत्राद्वारे कळवलं आहे. कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजस्थानमधून निघून मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून प्रवास करून महाराष्ट्रात येणार आहे. या विषयी राज्याने संबंधित राज्यांना पत्राद्वारे कळवले आहे. राज्यात परतल्यानंतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.
राजस्थानच्या कोट्यातून महाराष्ट्राच्या 1800 विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवसात विद्यार्थ्यांना आणण्याचं काम सुरु होईल. 3 तारखेच्या आत सर्व विद्यार्थ्यांना आणू, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून काल दिली होती.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या प्रकरणी संवेदनशीलता दाखवत तातडीने पुढाकार घेत महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थ्यांना स्वगृही परतायची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी सत्यजीत तांबे यांना ट्वीट करून दोन्ही राज्य सरकारे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी हालचाली करत आहेत, अशी माहिती दिली होती. सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राजस्थान सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद देण्याची मागणी केली होती, सोबतच पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या स्वगृही पोहचवण्यासाठी हालचाली सुरू करण्याबाबत सूचना केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
Advertisement