काशीपीठाच्या ज्ञानसिंहासनावर उत्तराधिकारी अन् 87 वे जगद्गुरू म्हणून सोलापूरचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी
काशीपीठाच्या ज्ञानसिंहासनावर उत्तराधिकारी आणि 87 वे जगद्गुरू म्हणून सोलापूरचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी (Dr Mallikarjun Shivacharya Mahaswami) आरूढ झाले आहेत
Solapur News Updates : पंच पीठांपैकी एक पीठ असलेल्या काशीपीठाच्या ज्ञानसिंहासनावर उत्तराधिकारी आणि 87 वे जगद्गुरू म्हणून सोलापूरचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी (Dr Mallikarjun Shivacharya Mahaswami) आरूढ झाले आहेत. वाराणसीत अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडला. शुक्रवारी पहाटे ब्राम्ही मुहूर्तावर पडलेल्या सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी सोलापुरातून देखील अनेक भाविक हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी हजर होते.
काशी पिठाच्या जंगमवाडी मठात असलेल्या परंपरेच्या ठिकाणी हा विधी पार पडला. काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य, श्रीशैल जगद्गुरू चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैनपीठांचे जगद्गुरू डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र यांनी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी मंत्रोपदेश आणि विधी करून पट्टाभिषेक सोहळ्याद्वारे पीठाची जबाबदारी सोपविली.
काशी पीठाचे विद्यमान जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या मस्तकावर चरणकमल ठेवून मंत्रोपदेश दिला. त्यानंतर चादीचे कमंडलू, पिवळी पताका असलेला पीठाचे प्रतीक दंड प्रधान करण्यात आले. यावेळी नूतन जगदगुरुच्या मस्तकावर तब्बल एक किलो वजन असलेले सोन्याचे किरीट ठेवून त्यांना जगद्गुरुचे अधिकार देण्यात आले.
पट्टाभिषेक सोहळ्यानंतर जंगमवाडी मठापासून ते दशाश्वमेध घाटापर्यंत अड्डपालखी काढण्यात आली. यावेळी हजारो भाविकआणि शिवभक्तांसह, 101 जलकुंभधारी सुवासिनींचा देखील सहभाग होता. यावेळी शिवाचार्य महास्वामीजीकी जयचा जयघोष करण्यात आला. विशेष म्हणजे वाराणसी येथे झालेल्या या पालखी सोहळ्यात सोलापूरसह अन्य शहरासोबत राज्यातील भाविक सहभागी झाले होते. तसेच सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे देखील या संपूर्ण सोहळ्यास उपस्थित राहिले.