जाहिरातीचे बोर्ड बदलताना विजेचा धक्का, सोलापुरात दोन जणांचा जागीच मृत्यू
सोलापुरात (Solapur) एक धक्कादायक घटना घडली आहे. जाहिरातीचे बोर्ड बदलताना विजेचा धक्का लागण्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Solapur : सोलापुरात (Solapur) एक धक्कादायक घटना घडली आहे. जाहिरातीचे बोर्ड बदलताना विजेचा धक्का लागण्याने दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रशेखर नारायण दोन्तुल वय 42 आणि गंगाधर ताटी वय 40 अशी दोघां मृतांची नावे आहेत. सोलापूरच्या एमआयडीसी परिसरातील सुनील नगरमध्ये ही घटना घडली.
सोलापूरच्या एमआयडीसी परिसरातील सुनीलनगर परिसरात राहणाऱ्या अशोक पोगुल यांच्या घराच्या गच्चीवर जाहिरात बदलण्याचे काम चंद्रशेखर नारायण दोन्तुल आणि गंगाधर ताटी या दोघांनी घेतलं होते. दुपारी हे काम सुरु असताना MSEB च्या सर्व्हिस वायरचा स्पर्श होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केल. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. घटना कळताच मृतांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. दरम्यान, दोन युवकांचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



















