सर्व्हिस बुक पाहता येणार आता मोबाईलवर, सोलापूर जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम
जिल्हा परिषदेच्या सर्व 14 हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका ह्या डिजीटलाईज करण्यात आल्या आहे. यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने विशेष असे अॅप देखील तयार केले आहे.
सोलापूर : शासकीय कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सेवा पुस्तकाचे महत्व खूप जास्त आहे. सेवा पुस्तक अदययावत नसल्यास सेवानिवृत्तींनंतर देखील कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं. यावर सोलापूर जिल्हा परिषदेने अनोखा उपाय शोधून काढलाय. जिल्हा परिषदेच्या सर्व 14 हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका ह्या डिजीटलाईज करण्यात आल्या आहे. यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने विशेष असे अॅप देखील तयार केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपले सर्व्हिस बुक हे मोबाईलवर पाहता येणार आहे.
सोलापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पेनेतून हा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येतोय. मुख्य कार्य कारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याजवळ काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सेवानिवृत्तीनंतर देखील केवळ सेवा पुस्तिका अद्ययावत नसल्यानं पेन्शन मिळण्यास अडचण येत होती. तेव्हा पासून कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका अद्ययावत करण्याचे काम जिल्हा परिषदेने हातात घेतले. सर्व 14 हजार कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यायावत झाल्यानंतर या सेवा पुस्तकांचे डिजीटलयाझेन करुन मोबाईलवर उपलब्ध करुन दिल्यास सर्व कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल अशी संकल्पना स्वामी यांनी मांडली.
याच संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या आयटी सेल आणि काही टेक्निकल एक्सपर्टची मदत घेत जिल्हा परिषदेने एक अॅप विकसीत केले. दोन महिने जवळपास या अॅपवर काम केल्यानंतर सर्व कमर्चाऱ्यांचे अद्ययावत केल्यांनतर ते या अॅपच्या सर्वरवर अपलोड करण्यात आले. त्यामुळे आता सोलापुर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आपल्या मोबाईलवरुन हे सर्व्हिस बुक पाहू शकणार आहेत. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आले आहे. त्यामुळे केवळ स्वत:चे सर्व्हिस बूक हे कर्मचाऱ्यांना पाहता येईल. डेटा सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने देखील खबरदारी घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या सोबतच कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंडाच्या स्लीप देखील याच अॅपवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी जे संदेश पाठवले जातात ते संदेश अॅपद्वारे एकाच क्लिकवर 14 हजार कर्मचाऱ्यांना पाठवणे शक्य होणार आहे.
राज्याचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते हे अॅप आज लॉन्च करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अपर मुख्य सचिव राजेश कुमार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सोालापूर जिल्हा परिषदेच्या या कार्याचे तोंडभरुन कौतुक केले. "सोलापूर जिल्हा परिषदेने नेहमीच राज्याला पथदर्शी ठरतील असे उपक्रम दिले आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सोलापूर जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथमच ई-सेवापुस्तक प्रणाली राबवून राज्याला पथदर्शी उपक्रम दिला आहे. सेवा पुस्तक अद्ययावत नसेल तर सेवानिवृत्ती वेळी अधिकारी व कर्मचारी यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. सीईओ स्वामी यांनी नेमकी हीच अडचण ओळखून हा उपक्रम हाती घेतला व पुर्णत्वास नेला. कमी कालावधीत तब्बल 14000 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करुन स्कॅन करणे हे जीकरीचे काम पूर्ण केले. सोलापूर जिल्हा परिषदेचा ई-सेवापुस्तक प्रणाली उपक्रम राज्यभर राबऊ" अशी भावना अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केली.
दरम्यान राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा उपक्रम राबविला जात असल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. बार्शी पंचायत समिती येथील कर्मचारी आनंद साठे या कर्मचाऱ्याने सेवा पुस्तक स्कॅन करून पीडीएफ स्वरुपात कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर देण्याची संकल्पना मांडली होती. जिल्हा परिषदेत परत आल्यानंतर येथील अधिकारी व माहिती तंत्रज्ञान कक्ष यांच्याशी चर्चा केल्यानंतर ॲप स्वरूपात सेवा पुस्तक ऑनलाइन करण्याची संकल्पना मी मांडली. त्यानंतर सलग सहा महिने जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी अपार मेहनत घेऊन हे प्रचंड वाटणारे काम लिलया पार पडले. अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.