Nagpur Police : सेंद्रिय खतांच्या पोत्यातून गांजाची तस्करी; नागपूर सीमेवर ट्रकमधून 1500 किलो गांजा जप्त
ओडिशामधून सेंद्रिय खत घेऊन निघालेल्या ट्रकमध्ये उच्च प्रतीच्या गांजाचे जवळपास 50 पोते लपवून ठेवण्यात आल्याची 'टीप' पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.
Nagpur News : गांजाच्या वाहतुकीसाठी नागपूर मार्ग हा तस्करांसाठी 'सेफ' मानण्यात येत होता. मात्र नागपूर पोलिसांनीही (Nagpur Police) आंतरराज्य तस्करांवर 'वॉच' ठेवून धडाकेबाज कारवाई सुरु केली आहे. याअंतर्गत नागपूर सीमेवर एका ट्रकमधून सुमारे 1500 किलो गांजा जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार जप्त करण्यात आलेला गांजा हा उच्च दर्जाचा आहे. तसेच याचा पुरवठा बीडमध्ये करण्यात येणार होता.
गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आज (16 नोव्हेंबर) पहाटे नागपूरच्या कापसी परिसरात ही कारवाई केली. ओडिशामधून सेंद्रिय खत घेऊन निघालेल्या ट्रकमध्ये सेंद्रिय खताच्या शेकडो पोत्यांच्या मध्ये उच्च प्रतीच्या गांजाचे जवळपास 50 पोते लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विशेष प्रशिक्षित 'केनाईन डॉग'च्या मदतीने या ट्रकची तपासणी केली आणि त्यामध्ये सुमारे पंधराशे किलो गांजा सापडला आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांच्या माहितीवर बीडमध्ये ही दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रकमध्ये लादलेले सेंद्रिय खत शिर्डीला पाठवण्यात येत होते. त्यामुळे शिर्डीमध्येही यासंदर्भात पोलीस तपास करणार आहे. दरम्यान संपूर्ण 1500 किलो गांजा निश्चितच बीडमध्ये वापरला जाणार नव्हता. तर तो तिथून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवला जाणार होता का? या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहितीनुसार इतर राज्यातून गांजाची तस्करी करण्यासाठी नागपूर मार्ग सुरक्षित मानला जात होता. अनेक वर्षांपासून नागपूर सिमेवरुन ही तस्करी सुरु होती. मात्र पोलिसांना या संदर्भात गुप्त माहिती मिळाली. तेव्हापासून पोलिसांकडून या मार्गावर 'वॉच' ठेवण्यात येत होता. ओडिशामधून मोठा गांजा साठा बीडमध्ये पोहोचणार असून नागपूर सिमेजवळून जाणार असल्याची 'टीप' नागपूर पोलिसांना मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
तस्करांची कुंडली काढणार
पोलिसांच्या छाप्यात पकडण्यात येणाऱ्या गांज्यापेक्षा हा गांजा उच्च दर्जाचा असल्याने हा कुठून निघाला. तसेच याठिकाणी आणखी साठा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दिशेनेही पोलीस तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी तस्करांकडून रेल्वे मार्गाचाही वापर करण्यात येत होता. मात्र रेल्वे सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याने रस्ते मार्गाचा वापर आता तस्करांनी सुरु केला आहे. ऑक्टोबरमध्ये नागपूर पोलिसांनी शहरात अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई सुरु केली होती. यामध्ये अवघ्या काही तासांतच पोलिसांनी शंभरपेक्षा जास्त जणांवर कारवाई करुन 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.
ही बातमी देखील वाचा