Sindhudurg Green Sea Turtle : महाराष्ट्रात पहिल्या 'ग्रीन सी टर्टल' घरट्याची नोंद, कोकण किनाऱ्यावर घरट्यातून 74 पिल्लं तारकर्ली समुद्रात
Sindhudurg Green Sea Turtle : महाराष्ट्रात पहिल्या 'ग्रीन सी टर्टल' घरट्याची नोंद करण्यात आली आहे. 'ग्रीन सी टर्टल'च्या राज्यातील पहिल्या संरक्षित घरट्यातून 74 पिल्ले तारकर्ली समुद्रात.
Sindhudurg Green Sea Turtle : महाराष्ट्र किनारपट्टीवर पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील (Sindhudurg) देवबाग-तारकर्ली येथे संरक्षित करण्यात आलेल्या 'ग्रीन सी टर्टल' (Green Sea Turtle) या समुद्री कासवाच्या घरट्यातून 74 पिल्लं बाहेर येत समुद्रात उतरली. हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी मच्छीमार आणि सागर प्रेमींनी किनाऱ्यावर गर्दी केली होती. देवबाग-तारकर्ली किनारपट्टीवर समुद्री कासवानं अंडी घालून घरटं बनविल्याची घटना कासव मित्र पंकज मालंडकर 11 जानेवारी रोजी समोर आणली होती.
सुरुवातीला हे घरटं ऑलिव्ह रिडले या सागरी कासव प्रजातीचं असल्याचं बोललं जात होतं. परंतु या कासवाचे फोटो आणि व्हिडीओ येथील पर्यावरण विषयक अभ्यासक संदीप बोडवे यांनी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविलं होते. या फोटो आणि व्हिडीओमधील कासव हे 'ऑलिव्ह रिडले' या सागरी कासव प्रजाती पेक्षा काहीसं वेगळं वाटत असल्याचं कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कासव अभ्यासकांशी याबाबत चर्चा केली. सखोल माहितीसाठी फोटो आणि व्हिडीओ बंगळुरु येथील वाईल्ड लाईफ कॉन्झव्हेशन सोसायटीचं कासव अभ्यासक नुपूर काळे यांनाही पाठविण्यात आलं. काळे यांनी या फोटो आणि व्हिडीओंचा अभ्यास केल्यानंतर हे कासव ग्रीन सी टर्टल असल्याचं स्पष्ट केलं.
ग्रीन सी टर्टलनं अंडी घालून घरटं बनविल्यानंतर 52 दिवसांनी 'ग्रीन सी टर्टल'च्या घरट्यांमधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली. सकाळी कासवाची पिल्लं घरट्यामधून बाहेर येतील याचा घरट्याचं रक्षक पंकज मालंडकर यांना पहिल्यापासून अंदाज असल्यामुळं ते पहाटेपासूनच घरट्याजवळ पहारा देत होते. घरट्यामधून 74 पिल्लं बाहेर आली.
महाराष्ट्रात पहिल्या 'ग्रीन सी टर्टल' घरट्याची नोंद देवबाग तारकर्लीच्या किनाऱ्यावर होणं आणि अंड्यातून पिल्लं बाहेर येणं ही येथील कासव संवर्धन करणाऱ्या निसर्ग मित्रांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मागील 52 दिवस हे घरटे आणि त्यातील अंड्यांचं संरक्षण करणं अतिशय महत्त्वपूर्ण होते. ग्रीन सी टर्टल या समुद्री कासव प्रजातीची भारतात फक्त गुजरात आणि लक्षद्वीप येतं घरटी आढळून येतात. या कासवाच्या खालील कवचाच्या बाजूला ग्रीन रंगाचे फॅट असते. म्हणून याला ग्रीन सी टर्टल असं संबोधले जाते. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी टर्टल, हॉक्स बिल, लॉगर हेड आणि लेदर बॅक अशा पाच प्रजाती आढळून येतात. त्यापैकी ऑलिव्ह रिडले महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर अंडी घालून घरटी बनवितात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आढळून येणाऱ्या ग्रीन सी टर्टल आणि लेदर बॅक ही आकाराने मोठी असणारी कासवं आहेत. ग्रीन सी टर्टल या समुद्री कासवाला अंडी देण्यासाठी पूर्ण वाढ होण्यास 20 ते 30 वर्षांचा कालावधी लागतो.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha