(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindhudurg News: तळकोकणातील चिपी विमानतळावरून विमानसेवा अनियमित; गोव्याच्या मोपा विमानतळासाठी चिपीचा बळी?
Sindhudurg Airport News : मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या चिपी विमानतळावरील विमानसेवा अनियमित झाली असून गोव्यातील मोपा विमानतळासाठी त्याचा बळी दिला जातोय का, अशी चर्चा सुरू आहे.
Sindhudurg Chipi Airport News : कोकणाच्या विकासात चिपी विमानतळाचा (Chipi Airport) मोठा वाटा राहिल असे सांगत अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, आता कोकणच्या विकासाला हातभार लावू पाहणाऱ्या चिपी विमानतळावरील विमानसेवा अनियमित सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा खेळखंडोबा होत आहे. गोव्यात सुरू झालेल्या मोपा विमानतळाच्या (Mopa Airport Goa) फायद्यासाठी चिपी विमानतळाचा बळी दिला जात नाही ना, अशी चर्चा कोकणवासियांमध्ये रंगू लागली आहे.
कोकणच्या सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमधील चिपी विमानतळावरून (Sindhudurg Chipi Airport) आता अनियमित विमानसेवा सुरू आहे. एक दिवसाआड मुंबई ते चिपी (Mumbai to Chipi Flight) आणि चिपी ते मुंबई (Chipi to Mumbai Flight Service) विमानसेवा सुरू आहे. मोठा गाजावाजा करत ही कोकणातील विमानसेवा आम्हीच सुरू केली हे सांगण्यासाठी सर्वच पक्षाचे राजकीय पक्षांचे पुढारी पुढे आले होते आणि आपल असं योगदान आहे हे सांगत होते. मात्र आता हीच विमानसेवा अनियमित झाली असून याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचा लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात ही विमानसेवा बंद होईल की काय अशी भीती स्थानिकांना वाटू लागली आहे.
पर्यटन वाढीसाठी हे विमानतळ एक महत्त्वाचा दुवा ठरेल असं म्हटल जात असे. मात्र आता अनियमित विमानसेवा असल्याने याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याची आवश्यकता आहे, असे स्थानिकांनी म्हटले. चिपी विमानतळावरून ब्लु फ्लॅग मानांकन मिळालेल्या भोगवे समुद्र किनारा 8 किलोमीटर असून मालवण सिंधुदुर्ग किल्ला 14 किलोमीटर तर वेंगुर्ले समुद्र किनारा 35 किलोमीटर तर राष्ट्रीय महामार्ग कुडाळ 25 किलोमीटर असल्याने चारी बाजूंनी पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होणास मदत होणार असल्याचे म्हटले जात होते. आता, चिपी विमानतळावरून विमानसेवा अनियमित होत असल्याचे त्याचा फटका पर्यटन व्यवसायालाही बसण्याची शक्यता आहे.
मोपा विमानतळासाठी चिपीचा बळी? ठाकरे गटाचा आरोप
राज्यातले आणि केंद्रातले भाजप सरकार गोव्यात मोपा विमानतळ झाल्यामुळे सिंधुदुर्गातील चीपी विमानतळ बंद करण्याचा घाट घालत आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक अडचणी असताना देखील सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू केलं. मात्र जवळच मोपा विमानतळ सुरू झाल्याने हे विमानतळ बंद करण्याचा घाट भाजप सरकार करत असल्याचे नाईक यांनी म्हटले.