गाय झाली माय! आठव्या महिन्यापासून सई थेट गाईला पिते, करमाळ्यातील चिमुरडी चर्चेचा विषय
भगवान कृष्ण थेट गाईच्या कासेला तोंड लावून दूध प्यायचे अशी पुराणातील गोष्टी आपण ऐकत असतो मात्र अशीच एक चमत्कारिक कहाणी करमाळा तालुक्यातील केम येथे अनुभवायला मिळत आहे.
करमाळा : गायीला हिंदू धर्मात गोमाता म्हणतात आणि त्यामुळेच गाय आणि माय हे शब्द पुरातन काळापासून पुढे आले आहेत. भगवान कृष्ण थेट गाईच्या कासेला तोंड लावून दूध प्यायचे अशी पुराणातील गोष्टी आपण ऐकत असतो मात्र अशीच एक चमत्कारिक कहाणी करमाळा तालुक्यातील केम येथे अनुभवायला मिळत आहे.
करमाळा तालुक्यातील केम येथे परमेश्वर तळेकर यांनी देशी गाईचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले आहे. देशी गाईंपासून मिळणारे दूध , तूप , शेण , गोमूत्र याला मोठी मागणी असल्याने तळेकर कुटुंबाने देशी गाईंना दैवत मानून शेतीचा हा सुरु केला आहे. आपल्या शेताला गोमाता मंदिर मानून हे कुटुंब गाईंची सेवा करीत असते . या देशी गोमातांमुळे तळेकर कुटुंबाला सुख , आरोग्य आणि समृद्धी आल्याची भावना असल्याने देशी गाईंचे महत्व सांगत परमेश्वर तळेकर आपल्या दुचाकीवरून परिसरात फिरत असतात.
याच तळेकरांची आठ महिन्याची नातं सई हिलाही आजोबांच्या प्रमाणे गाईंचा विशेष लळा लागला होता . हे पाहून आजोबा परमेश्वर यांनी एक दिवस सईला कपिला या गाईचे दूध पिण्यासाठी गोठ्यात नेले. चिमुरड्या सईचे तोंड कपिला गाईच्या आचळाला लागताच गाईने पान्हा सोडला आणि चिमुरडी सई थेट गाईला पिऊ लागली. यानंतर रात्री देखील तिला भूक लागल्यावर ती गोठ्यात जाते. त्यावेळी कपिला गाय तिच्या जवळ येऊन उभी राहून तिला आपले दूध पिण्यास देत असे .
आता सई दोन वर्षाची झाली आहे मात्र आजही तिला भूक लागली कि थेट गाईच्या गोठ्यात जाऊन कपिला गाईच्या कासेला तोंड लावून धारोष्ण दूध पिते . कपात किंवा ग्लास मध्ये दिलेले दूध सई पीत नाही किंवा दुसरेही ती काही खात नाही. कुटुंबासाठी ही थोडी अडचण असली तरी आजोबा परमेश्वर यांच्या मते देशी गाईच्या दूध पिण्याने तिच्यामध्ये अतिशय झपाट्याने सुधारणा दिसत असून सई आता स्पष्ट उच्चारांमध्ये बोलते.
वयाच्या मानाने सईमध्ये शारीरिक प्रगतीही झपाट्याने होत असून लवकर चालू लागल्याचे आजोबा सांगतात. तिची बुद्धिमत्ता इतर लहान मुलांच्या तुलनेत विशेष दिसत असल्याने या देशी गाईमुळे आता आमच्या घरातील मुलेही हुशार सदृढ बनल्याचे आजोबा परमेश्वर अभिमानाने सांगतात.